
नवीन खडी मशिन प्रकल्पांना विरोध
सासवड शहर, ता. १८ ः सुपे खुर्द (ता. पुरंदर) येथे सुरू असलेल्या खडी मशिन प्रकल्पामुळे परिसरातील शेतीसह पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. त्यातच आणखी प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू आहे. ते प्रकल्प झाल्यास ग्रामस्थांच्या आणखी समस्या वाढणार असल्याने त्या प्रकल्पांना परवानगी देऊ नये, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्यावतीने तहसीलदार रूपाली सरनोबत यांना देण्यात आले.
पुरंदर तालुका पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष अमित पोमण, सोसायटीचे अध्यक्ष बाळासो पोमण, संजय गांधी योजना समितीच्या सदस्या उज्वला पोमण, प्रवीण पोमण, राजेंद्र बोराटे, लक्ष्मण चव्हाण, जयहिंद पोमण, रामदास पोमण, ज्ञानदेव पोमण, तानाजी पोमण, रोहिदास पोमण, अरुण पोमण, कृष्णाजी बोरकर, रोहिदास पोमण, लक्ष्मण पोमण यांच्यासह ८० शेतकऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
सुपे गावातील ज्या परिसरात खडी क्रशर प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्या भागात पिंपळे गावच्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात शेत जमीन आहे. येथे १०० ते १५० नागरिकांची वस्ती आहे. त्यांना केवळ डोंगरातील वाहते पाणी, विहीर, बोअरवेलच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होत आहे. अशा परिस्थितीत खडी प्रकल्प उभारल्यास मिळणारे पाणी कायमचे बंद होऊन रहिवास धोक्यात येण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सुपे गावात कोणताही खडी मशिन प्रकल्प उभारण्यास सुपे ग्रामपंचायतीचा विरोध आहे. ग्रामपंचायतीने २५ जुलै २०११ पासून २५ एप्रिल २०२२ रोजीच्या मासिक सभांत वेळोवेळी परवानगी नाकारली आहे. परंतु काही व्यावसायिक प्रकल्प उभारण्याचा घाट घालत आहेत. याप्रश्नी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप यांना निवेदन दिल्याचे पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष अमित पोमण यांनी सांगितले.
क्रशरमधून निर्माण होणाऱ्या धुलीकणांमुळे पशू, पक्षी, वन्यजीव आणि नागरिकांना धोका आहे. सुपे खुर्द परिसर इको सेन्सेटिव्ह झोन असल्याने, तसेच पीएमआरडीच्या विकास आराखड्यात वनीकरण विभागात समाविष्ट असल्याने परवानगी नाकारण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
- संजय जगताप,
आमदार, पुरंदर
Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02833 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..