सुपे खुर्दच्या सरपंच अनिता जाधव यांचे पद रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुपे खुर्दच्या सरपंच अनिता जाधव यांचे पद रद्द
सुपे खुर्दच्या सरपंच अनिता जाधव यांचे पद रद्द

सुपे खुर्दच्या सरपंच अनिता जाधव यांचे पद रद्द

sakal_logo
By

सासवड शहर, ता. १ ः सुपे खुर्द (ता. पुरंदर) येथील सरपंच अनिता चंद्रकांत जाधव यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सरपंच व ग्रामपंचायत सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.
याबाबत दीपक बापूसाहेब म्हेत्रे (रा. सुपे खुर्द, ता. पुरंदर) यांनी सरपंच अनिता चंद्रकांत जाधव यांचे सरपंचपद रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती. त्यात अनिता जाधव व त्यांच्या कुटुंबाने शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. त्यात त्या कुटुंबासह राहत असून, त्यांचे सासरे दिवंगत बबन हरिभाऊ जाधव यांच्या नावे नंबर ६४४ मालमत्ता आहे. सुपे खुर्द ग्रामपंचायत हद्दीत एकूण तीन जागांवर या कुटुंबांनी अतिक्रमण करून बांधकाम केल्याचे तक्रारीत म्हटले होते.
अनिता जाधव यांचे सासरे यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले आहे. तहसीलदारांच्या अहवालानुसार जाधव यांच्या कुटुंबातील व्यक्तीने शासकीय गायरानावर अतिक्रमण केले आहे. यामुळे अनिता जाधव यांना ग्रामपंचायत सरपंच तसेच सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. या बाबत अॅड बिपिन शिंदे व अॅड. कैवल्य भूमकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर अर्जदारांच्या वतीने बाजू मांडली.