
नारायणपूर येथे आजपासून जड वाहनांना प्रवेशबंदी
गराडे, ता. ३ ः नारायणपूर (ता. पुरंदर) येथील दत्त जयंती सोहळ्याला सोमवार (ता. ५) डिसेंबरपासून सुरुवात होत असून, नारायणपूरमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता पोलीस प्रशासनाने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही दत्त जयंती सोहळ्याच्या काळात अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली असून येणाऱ्या भाविक भक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी केले.
वाहन चालकांना पर्यायी मार्ग म्हणून कापूरहोळ कडून सासवडकडे जाणारी जड वाहने कापूरहोळ वरून बेंगलोर पुणे हायवे मार्गे नवीन बोगद्यातून पुण्याकडे जातील. तसेच सासवड कापूरहोळ रोड या मार्गावरील वाहने सासवड वीर मार्गे सारोळा तर सासवड दिवे घाट मार्गे कात्रज या मार्गाचा वाहनचालकांनी तसेच वरील मार्गाचा अवलंब करून सहकार्य करावे.
सोहळ्यासाठी सासवड पोलीस प्रशासन सज्ज असून सासवड पोलीस स्टेशनच्या वतीने सोहळ्यासाठी प्रत्येक मुख्य चौकात दक्षता कक्ष उभारला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, सासवड भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप व १० सहाय्याक पोलीस निरीक्षक, १५० पोलीस कर्मचारी तसेच ३० होमगार्ड असा बंदोबस्त असणार आहे.