पुरंदर किल्ल्यावर उद्या जयंती सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरंदर किल्ल्यावर उद्या जयंती सोहळा
पुरंदर किल्ल्यावर उद्या जयंती सोहळा

पुरंदर किल्ल्यावर उद्या जयंती सोहळा

sakal_logo
By

गराडे, ता. १२ : पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा सोहळा यंदा प्रथमच शासन स्तरावर होणार आहे. या सोहळ्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री विजय शिवतारे, आमदार संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्यासह संभाजी ब्रिगेड, तसेच पुरंदर प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप यादव यांनी दिली.
छत्रपती संभाजी महाराज जयंती किल्ले शिवनेरीवर साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या धर्तीवर शासनाने साजरी करावी, अशी मागणी विजय शिवतारे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली होती. त्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्यता देत या वर्षीपासूनच त्याची सुरवात करूयात, असे जाहीर केले. राज्यभरातील शंभूप्रेमींनी देखील यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. शिवतारे यांच्या मागणीनुसार पालकमंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढील कार्यवाही करण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार या वर्षीपासून हा सोहळा होणार आहे.
संभाजी ब्रिगेड व पुरंदर प्रतिष्ठान, पुरंदर पंचायत समिती यांच्या वतीने गेली अनेक वर्षे छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा सोहळा साजरा केला जात आहे. यात संभाजी महाराज यांचा पालखी सोहळा, अभिषेक, संभाजी महाराज यांच्या नावाने समाजात लोकोपयोगी काम करणाऱ्या व्यक्ती संघटना यांना पुरस्काराने सन्मानित केले जाते. शंभु प्रेमीसाठी महाप्रसाद व्यवस्था केली जाते, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अजयसिंह सावंत यांनी दिली.
दरम्यान, नारायणपूर येथे शनिवारी (ता. १३) संध्याकाळी ६.३० वाजता नारायण महाराज, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, नारायणपूर ग्रामस्थ, धाराऊ माता गाडे वंशज परिवार व ५ सरदार घराणे वंशज व मान्यवरांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून पुरंदर किल्ल्यावर नेण्यात येईल. त्यानंतर रात्रभर महाप्रसाद व ज्योतीचे स्वागत करण्यात येईल, असे पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे यांनी सांगितले. यावेळी संदीप जगताप, संतोष हगवणे, सागर जगताप, पुणे जिल्हा मराठा महासंघाचे अध्यक्ष प्रशांत वांढेकर आदी उपस्थित होते,