
आदर्श कार्यकर्ता पुरस्काराचे वितरण हिवरे येथे भानुकाका जगताप यांना वसंतदादा प्रतिष्ठानकडून प्रदान
गराडे, ता २२ : माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते हिवरे (ता. पुरंदर) येथे भानूकाका जगताप यांना ‘आदर्श कार्यकर्ता’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष स्वर्गीय शिवाजी पोमण यांच्या जयंतीनिमित्त वसंतदादा प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे होते.
‘‘समाजातील सामान्य माणसासाठी सातत्याने पाठपुरावा करून त्यांचे प्रश्न सोडविणारा तो ‘आदर्श कार्यकर्ता’. असे कार्यकर्ते ज्या पक्षात जास्त तो पक्ष सर्वच बाबतीत मोठा असतो, असे प्रतिपादन दुर्गाडे यांनी केले.
भाजपचे युवा नेते बाबाराजे जाधवराव म्हणाले, ‘‘राजकारणात कधी काय घडेल काही सांगता येत नाही. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो. जालिंदर कामठे कार्यकर्त्यांची काळजी घेतात.’’
माजी आमदार अशोक टेकवडे म्हणाले, ‘‘सामाजिक-राजकीय चळवळीत मोठे झालेले शिवाजी अप्पा यांचा चेहरा आमच्या डोळ्यापुढून कधीच दूर जाणार नाही. समाजात असे हजारो शिवाजी अप्पा तयार झाले पाहिजेत.’’
‘‘भानूकाका जगताप हे समाजाभिमुख काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे कामठे यांनी त्यांना हा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार दिला आहे. या माध्यमातून जगताप यांनी भविष्यात सामाजिक कामात हिरीरीने सहभाग घ्यावा,’’ असे आवाहन माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.
या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे, श्यामकांत भिंताडे, एम. के. गायकवाड, शब्बीर शेख, दिलीप जगताप, नीलेश जगताप, श्रीकांत ताम्हाणे, साकेत जगताप, मयूर जगताप, पूनम कुदळे, संतोष जगताप, ॲड. धनंजय भोईटे, सचिन पेशवे आदी उपस्थित होते. जालिंदर कामठे यांनी प्रास्ताविक केले. विकास भोसले यांनी सूत्रसंचालन केले, तर संदीप चाचर यांनी आभार मानले.