
चांबळीत फुलशेती लागवडीचे मार्गदर्शन
गराडे, ता. २४ : चांबळी (ता. पुरंदर) येथे तालुका कृषी अधिकारी व आत्मा पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम गाव बैठक व शेतकरी प्रशिक्षण अंतर्गत फुलशेतीची लागवड तसेच तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
खरीप हंगामाच्या अनुषंगाने सासवडचे कृषी पर्यवेक्षक गणेश जगताप व बोपगावचे कृषी सहायक विजय जाधव यांनी शेतकऱ्यांना लागवडीचे धडे दिले. फुलशेतीबाबत भारतीय कृषी संशोधन परिषद, अंतर्गत पुष्प अनुसंधान निर्देशालय मांजरी, पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. गणेश कदम यांनी मार्गदर्शन केले. चांबळी येथे गुलाब, बिजली, अस्टर, झेंडू यासारखी फुले मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. यामुळे तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव व शेखर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.
दरम्यान, गुलाब उत्पादक शेतकरी मधुसूदन शेंडकर यांच्या गुलाब बागेस भेट देण्यात आली. प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी विजय जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. शास्त्रज्ञ व कृषी विभाग, शेतकरी यांनी वारंवार भेटून शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यातील सुसंवाद वाढविल्यास गावातील शेतकऱ्यांचे उत्पन्न नक्कीच वाढेल असे प्रगतशील शेतकरी प्रकाश भालेराव यांनी सांगितले. यावेळी स्मिता वर्पे, सरपंच प्रतिभा कदम, संजय कामटे, रमेश राऊल, संतोष शेंडकर व शेतकरी उपस्थित होते. मारुती कामठे यांनी आभार मानले.
06962