बदल्या झालेल्यांना कार्यमुक्त करा

बदल्या झालेल्यांना कार्यमुक्त करा

सासवड शहर, ता. २५ : जिल्हाअंतर्गत सन २०२२-२३ मधील संगणकीय प्रणालीद्वारे बदल्या झालेल्या शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडील १५ मे रोजीच्या आदेशानुसार कार्यमुक्त करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इतर तालुक्यातून बदलीने पुरंदर तालुक्यात शिक्षक हजर होत आहेत. मात्र, पुरंदर तालुक्यातून बदली झालेल्या शिक्षकांना अद्याप कार्यमुक्त करण्याची कार्यवाही केलेली नाही. प्रवास कालावधी व इतर प्रशासकीय बाबींची पूर्तता होऊन परतालुक्यातील शिक्षकांना वेळेत बदली ठिकाणी हजर व्हावयाचे आहे. त्यासाठी पुरंदर तालुक्यातील बदली झालेल्या सर्व शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करण्याबाबत आदेश व्हावेत, अशी मागणी पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समितीने पुरंदरचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
गटविकास अधिकारी अमर माने यांची भेट न झाल्याने शिष्टमंडळाने पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी नीलेश गवळी यांच्याशी चर्चा केली. बदल्यांची फाइल यापूर्वीच गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठवलेली आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच, पुरंदर पंचायत समिती येथे महागाई भत्ता फरकाची थकबाकी बिले अद्यापपर्यंत शिक्षकांना मिळालेली नाहीत. महागाई भत्ता फरकाची थकबाकी बिले त्वरित मंजूर होण्याबाबत शासन आदेश झाले असून, सदरची देयके आवश्यक पूर्तता करून गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केलेली आहेत. पंचायत समितीअंतर्गत इतर कर्मचाऱ्यांना सदरची बिले दोन महिन्यापूर्वीच मिळालेली आहेत. मात्र, ती शिक्षकांना मिळण्यास विलंब होत आहे. पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शिक्षकांना सदरची बिले यापूर्वीच अदा केलेली आहेत, असे यावेळी निदर्शनास आले. ती त्वरित मंजूर करून शिक्षकांना मिळावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते महादेव माळवदकर पाटील, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील कुंजीर, सरचिटणीस भाऊसाहेब बरकडे, कार्याध्यक्ष सुनील जगताप, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष यशवंतराव दगडे, पुणे जिल्हा शिक्षक समिती पतसंस्थेचे अध्यक्ष मनोज दीक्षित, पुरंदर तालुका शिक्षक पतसंस्थेचे संचालक मनोज सटाले, पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस वसंतराव कामथे,शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप कदम, सरचिटणीस नंदकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com