
रस्त्याकडेला मोटारीत गर्भलिंग परीक्षण
इंदापूर, ता. १४ : इंदापूर तालुक्यात सुरवड-भांडगाव रस्त्यावर बेकायदेशीर गर्भलिंग परिक्षण करणाऱ्या पाच जणांच्या टोळीवर इंदापूर वैद्यकीय व पोलिस पथकाने संयुक्तपणे कारवाई केली. यावेळी या पथकाने पंचासमक्ष दोन लिंगपरीक्षण यंत्रासह मोबाईल संच व इतर वैद्यकीय साहित्य जप्त केले.
इंदापूर शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष खामकर यांनी या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात फिर्याद दिली. त्यानंतर कोळेगाव (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील डॉ. सुशांत हनुमंत मोरे, डॉ. हनुमंत ज्ञानेश्वर मोरे, त्याची पत्नी कमल हनुमंत मोरे, प्रवीण देशमुख (वय ३२, लॅबटेक्निशियन), तौसिफ अहमद शेख (वय ३०, वाहन चालक, दोघेही रा. राजाळे, ता. फलटण, जि. सातारा) या संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला.
इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. खामकर यांना एमएच ११ सीजी ८०१६ या क्रमांकाच्या मोटारीमध्ये गर्भवती महिलांची बेकायदेशीररीत्या तपासणी करून गर्भ लिंगपरीक्षण केल्याची माहिती मिळाली. त्यांनी इंदापूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, सहायक फौजदार के. बी. शिंदे, हवालदार शुभांगी खंडागळे, पोलिस नाईक बापू मोहिते, एएचटीयू पथकाचे पोलिस निरीक्षक माधुरी चव्हाण, उपनिरीक्षक माधुरी देशमुख यांच्यासह शोध सुरू केला असता त्यांना सुरवड-भांडगाव रस्त्यावर ही मोटार आढळली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधव कनकवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ. खामकर,डॉ. एकनाथ चंदनशिवे, बावडा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्रीकृष्ण खरमाटे, इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे सहायक वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल खनावरे व पोलिस पथकाने मोटारीची तपासणी केली असता त्यांना मोटारीमध्ये दोन व्यक्ती एका गर्भवती महिलेची गर्भ तपासणी करताना सापडले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी प्रवीण देशमुख, तौसिफ शेख, अशी त्यांची नावे असल्याची माहिती शोध पथकाला दिली. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी डॉ. सुशांत मोरे, डॉ. हनुमंत मोरे, त्याची पत्नी कमल मोरे यांनी अनेक गर्भवती महिलांच्या गर्भाचे लिंगपरीक्षण केल्याचे व सुरवड येथे गर्भवती महिलेची गर्भतपासणी करण्यासाठी पाठवल्याचे उघड झाले. त्यातून ही आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश झाला.
Web Title: Todays Latest District Marathi News Ind22b02935 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..