
अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सक्षणा सलगर यांना जाहीर
जेजुरी, ता. २४ : येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयात यंदापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात येणार आहे. पहिला पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर यांना दिला जाणार आहे.
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानने अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८व्या जयंती दिनापासून ३१ मे रोजी हा पुरस्कार सुरू करण्याचे निश्चित केले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते दिला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे आणि सतीश खोमणे, रश्मी बागल-कोलते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या पुरस्काराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय कोलते हे असणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी (ता. ३१) सायंकाळी ५ वाजता जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे, अशी माहिती सचिव शांताराम पोमण व प्राचार्य डॉ. बालाजी नाटकरे यांनी दिली.