धामणखेल येथे विधवा प्रथेला तिलांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामणखेल येथे विधवा प्रथेला तिलांजली
धामणखेल येथे विधवा प्रथेला तिलांजली

धामणखेल येथे विधवा प्रथेला तिलांजली

sakal_logo
By

जुन्नर, ता. ४ : धामणखेल (ता. जुन्नर) येथील ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सरपंच संतोष जाधव यांनी दिली. असा ठराव करणारी धामणखेल तालुक्यातील तिसरी ग्रामपंचायत ठरली आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत व राजश्री शाहू महाराज स्मृती शताब्दीवर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपण्यासाठी हा ठराव करण्यात आला आहे. याबाबत शासनाच्या परिपत्रकानुसार तसेच धामणखेल येथील महिला अस्मिता ग्रामसंघाच्या लेखी मागणीनुसार ३१ मे रोजी झालेल्या मासिक सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. याबाबत ग्रामस्थांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे यासारख्या प्रथांचे पालन करण्यात येऊ नये तसेच समाजात वावरत असताना पत्नीला विधवा म्हणून अवहेलनेस सामोरे जाऊ लागू नये, याची दक्षता घ्यावी तसेच सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ द्यावे असे कळविण्यात आले आहे.
विधवा प्रथा बंद करण्याच्या विषयावर सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला. कोरोना महामारीत कुटुंबातील कर्त्या पुरुषांचे निधन झाल्याने महिलांच्या भाळी विधवा होण्याचे दुर्भाग्य आले. पुरोगामी महाराष्ट्रात आजही समाजात विधवांना अवहेलना सहन करावी लागते. धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात विधवांचा सहभाग डावलला जातो. पतीच्या निधनानंतर मानसिकदृष्ट्या खचलेल्या विधवांना समाजात सन्मानाने वावरता यावे. त्यांची अवहेलना बंद व्हावी. या उदात्त हेतूने यापुढे गावात अनिष्ट विधवा प्रथेला कायमची तिलांजली देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला असल्याचे जाधव यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03285 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top