
जुन्नरमध्ये ३५ किलो प्लॅस्टिक जप्त
जुन्नर ता. ६ : जुन्नर नगर पालिकेने शहरातील दुकानदारांकडून एकल वापर (सिंगल युज) ३५ किलो प्लॅस्टिक जप्त केले.
एकल वापर प्लॅस्टिकचा वापर बंद करण्याचा निर्णय नगर पालिका प्रशासनाने घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. कर्मचाऱ्याच्या पथकामार्फत बाजार पेठेत फिरून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी मनोज पष्टे व आरोग्य अधिकारी प्रशांत खत्री यांनी सांगितले.
एकल वापर प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या व्यापारी व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने ऑगस्ट २०२१ मध्ये अधिसूचित केलेल्या सुधारित प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०२१ नुसार सजावटीसाठी प्लॅस्टिक व थर्मोकोल याशिवाय मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटची पाकिटे यांची प्लॅस्टिकची आवरणे, प्लॅस्टिकच्या कँडी काड्या, आइस्क्रीम कांड्या, प्लेट, कप, ग्लास, कटलरी काटेचमचे, चाकू, स्ट्रॉ, ढवळण्या यासह १०० मायक्रोनपेक्षा कमी जाडीचे पीव्हीसी बॅनर्स यावर बंदी आहे. तसेच, महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्मोकोल अधिसूचना २०१८ अंतर्गत कंपोस्टेबल प्लॅस्टिक (कचरा व नर्सरीच्या पिशव्या सोडून) सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, हँडल असलेल्या व नसलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, डिश, बाऊल, कंटेनर यावर देखील बंदी आहे.
कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जागेवर पाचशे रुपये दंड, तसेच संस्थात्मक पातळीवर पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा वापर केल्यास दहा हजार रुपये दंड, तर तिसऱ्यांदा वापर करताना निदर्शनास आल्यास २५ हजार रुपये दंड व तीन महिन्यांचा कारावास, अशी शिक्षा होऊ शकते. आरोग्य विभागाने अशा प्लॅस्टिकच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथकही निर्माण केले आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03373 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..