जुन्नरला बिबट सफारीवरून डरकाळ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरला बिबट सफारीवरून डरकाळ्या
जुन्नरला बिबट सफारीवरून डरकाळ्या

जुन्नरला बिबट सफारीवरून डरकाळ्या

sakal_logo
By

जुन्नर, ता. २६ : बिबट सफारीसाठी वनविभागाच्या समितीने कुरण (ता. जुन्नर) परिसरातील जागा योग्य असल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला आहे. माजी आमदार शरद सोनवणे हे आंबेगव्हाण येथे बिबट सफारी व्हावी, यासाठी आग्रही असल्याने बिबट सफारीच्या जागेवरून तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
बिबट सफारी बारामतीला मंजूर झाल्यानंतर माजी आमदार सोनवणे यांच्यासह विविध संस्था, संघटना व नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिबट सफारी जुन्नरला होणार असल्याचे जाहीर केले होते. आमदार अतुल बेनके यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आंबेगव्हाण वनक्षेत्राची पाहणी केली होती. मात्र, बिबट सफारीसाठी या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी असल्याने आंबेगव्हाणऐवजी कुरण परिसराची जागा योग्य असल्याने याबाबतचा सकारात्मक प्रस्ताव उपवनसंरक्षक कार्यालयाने मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक यांना पाठविला आहे.

या कारणांमुळे कुरणची निवड
जिओ इंजिनिअर्स संस्थेने कुरण व खानापूर परिसरात ६ मे रोजी सर्वेक्षण केले. या परिसरातील सुमारे ८० ते ८५ टक्के क्षेत्र सपाटीचे असून, १२ टक्के क्षेत्र सौम्य उताराचे असल्याचे सर्वेक्षणात नमूद केले आहे. या भागात मिश्र स्वरूपाचा झाडा-झडोरा आहे. तसेच, या क्षेत्रात येण्यासाठी मुख्य रस्त्यापासून पोहच रस्ता आहे. खानापूर आणि कुरणचे एकत्रित ४७.१४ हेक्टर वनक्षेत्र बिबट सफारीच्या प्रकल्पासाठी योग्य असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे बिबट सफारी आंबेगव्हाणऐवजी कुरण परिसरात होणार असल्याची चर्चा होत आहे. नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगतचे क्षेत्र असल्यामुळे पर्यटकांना सफारीला भेट देणे सोयीचे होणार आहे. हे क्षेत्र बिबट्यांच्या नैसर्गिक अधिवासासाठी सुयोग्य आहे. हा भाग सपाटीचा असल्याने सफारी क्षेत्र कुंपण करून बंदिस्त करणे, पिंजरे उभारणे, त्यात पाणी व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच वाहतूक करणे सोयीचे ठरणार आहे. येथून बिबट्या निवारा केंद्राचे अंतर १३ किलोमीटर असल्याने जखमी बिबट्यांवर उपचार व आधुनिक सुविधांपर्यंत पोचणे सोयीचे राहणार असल्याचे नमूद केले आहे.

‘राजकीय आकसापोटी बदल’
माजी आमदार सोनवणे यांनी जुन्नर येथे पत्रकार परिषद घेऊन बिबट सफारी आंबेगव्हाणला व्हावी, यासाठी मी प्रयत्न केले, मात्र या प्रकल्पाचे श्रेय मला मिळू नये म्हणून राजकारण केल्याचे म्हटले आहे. तत्कालिन वनसचिव विकास खर्गे यांनी आंबेगव्हाणची जागा बिबट सफारीसाठी योग्य असल्याचे सांगितले होते. येथील नैसर्गिक अधिवास असलेली जागा सोडून कुरणच्या मोकळ्या जागेवर मानवी वस्तीजवळ बिबट सफारी करणे योग्य नाही. केवळ राजकीय आकसापोटी जागा बदलल्याने याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व वनमंत्री यांना भेटून चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03498 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..