जुन्नर येथे शवदाहिनी वापराविनाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नर येथे शवदाहिनी वापराविनाच
जुन्नर येथे शवदाहिनी वापराविनाच

जुन्नर येथे शवदाहिनी वापराविनाच

sakal_logo
By

जुन्नर, ता. ५ : जुन्नर नगरपालिकेने नगर पालिकेने कुकडी नदीतीरावर भास्कर घाट स्मशानभूमी येथे गॅस शवदाहिनी उभारली आहे. गॅस शवदाहिनी बसविणारी जुन्नर नगरपालिका ही पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिलीच नगर पालिका आहे. परंतु नागरिकांकडून पारंपरिक पद्धतीच्या अंत्यसंस्कारावरच भर दिला जात आहे. त्यामुळे शवदाहिनीचा वापर कमी प्रमाणात होत आहे.
शवदाहिनीच्या कामासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून सुमारे ८५ लाखांचा निधी उपलब्ध झाला. यात शवदाहिनी व इमारतीचे बांधकाम करण्यात आले. या शिवाय संरक्षक भिंतीसाठी नगरोत्थान योजनेत स्वतंत्र तरतूद केली आहे. पर्यावरणपूरक व कमी वेळात अंत्यसंस्कार हा गॅस शवदाहिनीचा मुख्य हेतू असल्याने भविष्यात गॅस शवदाहिनी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मात्र यासाठी लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडाची उपलब्धता असल्याने तसेच इतर विधी करता येत असल्याने या पद्धतीस गावकऱ्यांकडून प्राधान्य दिले जाते. गॅस शवदाहिनीसाठी व्यावसायिक ४८ गॅस सिलिंडर ठेवण्यात आले असून यापैकी २४ सिलिंडर राखीव आहेत. एका मृतदेहावर सुमारे ६५० अंश सेल्सिअस तापमानात साधारणतः १५ मिनिटांमध्ये अंत्यसंस्कार पूर्ण होतात यासाठी एक गॅस सिलिंडर लागतो. एका अंत्यविधीस फक्त दोन हजार ५०० रुपये खर्च येतो. एकंदरीतच सर्व सोयींयुक्त गॅस शवदाहिनी अंत्यसंस्कारासाठी असूनही तिचा वापर कमीप्रमाणात होत आहे.

सात महिन्यात केवळ दहा अंत्यविधी
एप्रिल पासून गेल्या सात महिन्यात शवदाहिनीत दहा अंत्यविधी झाल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. नगरपालिकेत या कालावधीत ४७ पुरुष व ४८ महिला अशा एकूण ९५ मृत्यूंची नोंद आहे. गॅस शवदाहिनी असलेल्या भास्करघाट येथे पारंपरिक पद्धतीने तीसहून अधिक अंत्यसंस्कार विधी झाले, त्या तुलनेत शवदाहिनीत कमी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

वृक्षतोडीस आळा बसेल
शवदाहिनीत कमी वेळात व कमी खर्चात अंत्यविधी होतात. लाकडाचा वापर होत नसल्याने वृक्षतोडीस आळा बसेल. प्रदूषण होणार नाही. तसेच पर्यावरणावर परिणाम होणार नाही. यामुळे अंत्यविधीसाठी शवदाहिनीचा वापर करावा असे आवाहन नगर पालिका प्रशासनाने केले आहे.

पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करताना होणार लाकडांचा वापर, त्यासाठी होणारी वृक्षतोड, प्रदूषण टाळण्यासाठी गॅस शवदाहिनीचा वापर गरजेचा आहे. यासाठी प्रशासनाकडून गावागावात तसेच परिसरात मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात यावी.
भाऊ कुंभार, माजी नगरसेवक