शिवजयंतीला शिवनेरीवर ‘महादुर्ग उत्सव’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवजयंतीला शिवनेरीवर ‘महादुर्ग उत्सव’
शिवजयंतीला शिवनेरीवर ‘महादुर्ग उत्सव’

शिवजयंतीला शिवनेरीवर ‘महादुर्ग उत्सव’

sakal_logo
By

जुन्नर, ता. १९ : किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीला येत्या १८ ते २२ फेब्रुवारीदरम्यान राज्य सरकारच्या वतीने पाच दिवस ‘महादुर्ग उत्सव’ आयोजित करणार आहे. त्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून आठ कोटींचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती सोहळा शासकीय इतमामात साजरा होतो. मागील दोन वर्षे कोरोनामुळे हा सोहळा मर्यादित स्वरूपात साजरा केला होता. कोरोनाचे संकट दूर झाल्याने राज्यातील शिवभक्तांच्या भावनांचा सन्मान करून यंदाची शिवजयंती देदीप्यमान पद्धतीने साजरी व्हावी, यासाठी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पर्यटन तथा सांस्कृतिक मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेऊन मागणी केली होती. त्यानुसार येत्या १८ ते २२ फेब्रुवारी रोजी शिवनेरीवर महादुर्ग उत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या उत्सवाच्या आयोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बारा सदस्यांची समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये विधान परिषदेचे माजी सदस्य प्रवीण दरेकर, पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भारतीय पुरातत्त्व खात्याचे अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, उपविभागीय अधिकारी जुन्नर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महावितरणचे कार्यकारी अभियंता, जुन्नर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक, नाट्यकलावंत जयेंद्र मोरे, विभागीय पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक आदींचा समावेश आहे.

स्थानिक पदाधिकऱ्यांना डावल्याची चर्चा
महादुर्ग उत्सवाच्या आयोजन समितीत जुन्नरचे आमदार अतुल बेनके, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे तसेच राजकीय पक्षांचे स्थानिक आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश नसल्याची चर्चा होत आहे. तसेच, शिवनेरी किल्ला वन क्षेत्रात असताना वन विभागाचा प्रतिनिधी देखील या समितीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.