
शिवनेरीसह १२ पर्यटनस्थळांवर रोपवेचा प्रस्ताव सादर
जुन्नर, ता. १ ः श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर जाणाऱ्या पर्यटकांसाठी रोपवे करण्यात यावा, या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला राज्य सरकारने प्रतिसाद दिला असून, शिवनेरी गडासह सुमारे बारा पर्यटनस्थळी रोपवेचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे सादर केला आहे.
जुन्नर पर्यटन तालुका घोषित झाला असल्याने तालुक्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि शिवनेरी गडावर शिवजयंती उत्सवासह वर्षभर मोठ्या संख्येने येत असणाऱ्या पर्यटकांसाठी रोपवे ची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. यावेळी गडकरी यांनी राज्य सरकारने प्रस्ताव पाठविल्यास पर्वतमाला योजनेंतर्गत निधी मंजूर करण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार डॉ. कोल्हे यांनी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना पत्र पाठवून याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याची मागणी केली होती.
डॉ. कोल्हे यांच्या मागणीबरोबरच राज्यातील इतर पर्यटनस्थळी रोपवे बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले होते. त्यानुसार शिवनेरी गडासह सुमारे बारा पर्यटनस्थळी रोपवेचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे सादर केला आहे.
----------------------------
शिवनेरी गडावर रोपवे बांधल्यास ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान बालके, दिव्यांग अशा सर्वच स्तरातील शिवभक्त, इतिहास अभ्यासकांना गडावर जाण्यासाठी सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे. रोपवेमुळे जुन्नर तालुक्यातील पर्यटनाला चालना मिळेल. तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. तालुक्याचे अर्थकारण बदलण्यास मदत होईल. - डॉ. अमोल कोल्हे, खासदार
-------------------------
रोपवेचा प्रस्ताव असलेली ठिकाणे
किल्ले शिवनेरी, (जुन्नर, जि. पुणे), अलिबाग चौपाटी ते अलिबाग किल्ला (जि. रायगड), पन्हाळा (ज्योतिबा- जि. कोल्हापूर), त्र्यंबकेश्वर(जि. नाशिक), महाबळेश्वर (जि. सातारा), माथेरान (जि. रायगड), जेजुरी (जि. पुणे), विशाळगड (जि. कोल्हापूर), घोरपुरी (इलेफंटा- जि. रायगड), ब्राह्मगिरी (जि. नाशिक), माहूर (जि. हिंगोली), चंद्रेश्वर महादेव मंदिर, चांदवड (जि. नाशिक)
------------------------------------