
जुन्नरमधील चार संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेस स्थगिती
जुन्नर, ता. २ : सहकार विभागाने काढलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्याच्या आदेशामुळे जुन्नर तालुक्यातील चार सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या २० डिसेंबरपर्यंत स्थगित होणार आहेत.
यामध्ये जुन्नर तालुका खरेदी विक्री संघ, जुन्नर तालुका आदिवासी आश्रमशाळा सेवक सहकारी पतसंस्था, सोमतवाडी शिक्षण मंडळ सेवक सहकारी पतसंस्था आणे व श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था नारायणगाव, या चार सहकारी संस्थांचा समावेश असल्याचे सहायक निबंधक सचिन सरसमकर यांनी सांगितले.
यापैकी जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल होऊन छाननी केली होती. सहा डिसेंबर ही अर्ज माघारीची अंतिम मुदत होती. तर, अन्य तीन संस्थांच्या मतदार याद्या प्रसिद्धी झाली होती व निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार होता. या आदेशाने ही प्रक्रिया आता २० तारखेनंतर पुढे सुरू होईल.
राज्यातील ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्याच्या सहकार विभागाने हा आदेश काढला असून त्यानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या असल्याचे या आदेशात नमूद केले आहे.