छायाचित्र प्रदर्शनातून उलगडणार जुन्नरचे वैभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छायाचित्र प्रदर्शनातून उलगडणार जुन्नरचे वैभव
छायाचित्र प्रदर्शनातून उलगडणार जुन्नरचे वैभव

छायाचित्र प्रदर्शनातून उलगडणार जुन्नरचे वैभव

sakal_logo
By

जुन्नर, ता. १८ : पहिला पर्यटन तालुका ठरलेल्या जुन्नर तालुक्याचे वैभव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचविण्यासाठी शिवनेरी ट्रेकर्स संस्थेच्या वतीने प्रमुख शहरातून बहुआयामी जुन्नर या छायाचित्र प्रदर्शन मालिकेचे आयोजन केले आहे, अशी माहिती शिवनेरी ट्रेकर्सचे अध्यक्ष नीलेश खोकराळे यांनी दिली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून येत्या १६ व १७ जानेवारी रोजी या मालिकेतील पहिले छायाचित्र प्रदर्शन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर कलादालन येथे होणार आहे. यापाठोपाठ मुंबई, नाशिक, औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी या प्रदर्शनांचे आयोजन करणार असल्याचे उपाध्यक्ष सुभाष कुचिक यांनी सांगितले.

प्रदर्शनात जुन्नर तालुक्यातील दुर्गवैभव, लेणीसमुह, घाटवाटा, धरणे, धबधबे, आदिवासी लोकजीवन, खाद्यसंस्कृती, मंदिरे, निसर्ग व वनसंपदा, शेती, जैवविविधता या सर्वांचे दर्शन या प्रदर्शनात होणार आहे. जुन्नर तालुक्यातील छायाचित्रकारांनी काढलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांचा यात समावेश आहे. तसेच वनविभाग, वारसा संवर्धन समिती बोरी बुद्रुक व चाइल्ड फंड इंडिया या संस्थांची स्वतंत्र दालने हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. सोबतच जुन्नरचा प्रागैतिहासिक ठेवा व इतर संलग्न विषयांवर व्याख्यानांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

प्रदर्शनासाठी नि:शुल्क प्रवेश
जुन्नरच्या इतिहास, निसर्ग, पर्यावरणाचा ठेवा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी हे प्रदर्शन निःशुल्क आहे. सर्व वयोगटाच्या व्यक्तींना १६ व १७ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहता येईल. विद्यार्थ्यांपर्यंत प्रदर्शन पोचविण्यासाठी पुणे शहरातील शाळा व महाविद्यालयांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

पुणेकरांची होणार जुन्नरशी थेट जोडणी
निसर्ग व पर्यटन प्रेमी पुणेकरांची जुन्नरच्या इतिहास व पर्यटनाशी थेट जोडणी व्हावी यासाठी प्रदर्शनातून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रदर्शन पाहिल्यानंतर आवडलेल्या विषयातील स्थळांना भेट देण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना जुन्नरमधील त्या त्या क्षेत्रातील अग्रणी अभ्यासक व सेवादात्यांशी नि:शुल्क जोडणी करून देण्यात येणार आहे.

शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशन ही जुन्नर तालुक्यातील निसर्ग व दुर्गप्रेमी ट्रेकर, गिर्यारोहक तरुणांनी स्थापन केलेली शासन नोंदणीकृत विश्वस्त संस्था आहे. इतिहास, क्रिडा, निसर्ग, पर्यावरण व दुर्गसंवर्धनाच्या अनुषंगाने संस्थेमार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण, दुर्गस्वच्छता, ट्रेकिंग आदी उपक्रमांचा यात समावेश आहे.

छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन.
जुन्नर तालुक्यातील नव्हे तर राज्यभरातील छायाचित्रकार जुन्नरमधील उत्कृष्ट छायाचित्रांसह या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदवू शकतात. यासाठी डीएसएलआर कॅमेराने काढलेली किमान पाच एमबी आकाराची छायाचित्रे पाठविणे आवश्यक आहे. निवडक, उत्कृष्ट छायाचित्रांना प्रदर्शनात स्थान देण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी प्रदर्शन उपक्रम प्रमुख अनिकेत डुकरे मोबाईल नंबर ७४९८६९३१७४ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.