राजूरला साकारले धन्वंतरी औषधी वनस्पती उद्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजूरला साकारले धन्वंतरी औषधी वनस्पती उद्यान
राजूरला साकारले धन्वंतरी औषधी वनस्पती उद्यान

राजूरला साकारले धन्वंतरी औषधी वनस्पती उद्यान

sakal_logo
By

जुन्नर, ता. २५ : पुणे जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत जुन्नरच्या आदिवासी भागातील राजूर नंबर दोन येथे धन्वंतरी औषधी वनस्पती उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. यात नवग्रहांच्या वनस्पतींची वाटिका तयार केलेली आहे.
येथील आयुष आरोग्य वर्धिनी केंद्र राजूर पथकाने ह्या आगळ्या वेगळ्या उद्यानाची उभारणी केली आहे.

१५ गुंठे क्षेत्रात सत्तर वनस्पती
आयुष आरोग्य वर्धिनी केंद्राच्या सुमारे १५ गुंठे क्षेत्रात जून २०पासून दरवर्षी काही औषधी वनस्पती आणून त्यांची लागवड केली जात आहे. आज पर्यंत जवळपास वेगवेगळ्या चाळीस प्रजातींच्या एकूण ७० लहान मोठ्या औषधी वनस्पती उद्यानात उभ्या आहेत.

ग्रामस्थांकडून श्रमदान
उद्यानातील झाडांना ग्रामपंचायत पाणी पुरवठ्यातून येणारे पाणी दिले जाते. आवश्यकतेनुसार शेण खताचा वापर केला जातो. झाडांची देखभाल, उद्यान साफसफाई, पाणी-खते देणे आदी कामे केंद्रातील कर्मचारी करतात तसेच स्थानिक ग्रामस्थ देखील श्रमदान करून सहकार्य करतात.


उद्यानात ‘या’ दुर्मिळ औषधी वनस्पती
अडुळसा, तुळस, जास्वंद, चित्रक, दंती, बेल अर्जुन, जांभूळ, हिरडा, बेहडा, आवळा, फणस, पारिजातक, जयपाल, अग्निमंथ, पिंपळी, सफेद मुसळी, कोरफड, कुडा, भुई आवळा, सर्पगंधा, खदिर, पळस, बहवा, काटेसावर, रिठा, निलगिरी, अशोक, निरगुडी, बकुळ, रुद्राक्ष, शतावरी, शमी, गुळवेल, पाणफुटी, अस्थीवेल, आघाडा, पिंपळ, उंबर या वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.

असा होतो उपयोग
खोकला, दमा सारख्या श्वसन संस्थेच्या आजारांवर अडुळसा व तुळस उपयुक्त आहे. सर्व प्रकारचे सांधे दुखी, सांधे सुजणे यासाठी निर्गुडी, एरंड, पारिजातक उपयुक्त आहे. त्वचा विकरासाठी खदिर उपयुक्त आहे. त्वचेवरील जखमा तसेच ह्रदय रोगावरील औषधांमध्ये अर्जुन वनस्पतींची साल वापरतात. केश वर्धन व केसांच्या समस्यांसाठी तेल तयार करताना जास्वंद वापरतात. आवळा, हिरडा, बेहडा या वनस्पतींच्या फळांचा वापर त्रिफळा चूर्ण, च्यवनप्राश, पोटाचे विकार तसेच प्रतिकार शक्तिवर्धक अनेक औषधनिर्माण करताना केला जातो.

नवग्रहांच्या वनस्पतींची वाटिका
प्राथमिक आरोग्य पथक राजूर यावर्षी राष्ट्रीय आयुष अभियान जिल्हा परिषद पुणे अंतर्गत आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणून समाविष्ट केले गेले असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. बालाजी लकडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली उद्यान सुशोभीकरण तसेच वनस्पतींना त्याचे नाव व औषधी उपयोग असे फलक लावण्यात आले आहेत. तसेच नवग्रहांच्या वनस्पतींची वाटिका तयार केली आहे. यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप गोसावी, आरोग्य सेविका रंजना कदम, औषध निर्माण अधिकारी रवींद्र चव्हाण, परिचर कान्हू मुंढे, आशा सेविका यमुना मुंढे कार्यरत आहेत.


औषधी वनस्पतींची माहिती व आरोग्यासाठी घरगुती उपयोग लोकांना माहीत व्हावेत. चांगल्या आरोग्यासाठी, प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी तसेच काही सामान्य आजारासाठी लोकांनी दैनंदिन जीवनात औषधी वनस्पतींचा वापर करावा या उद्देशाने हे उद्यान उभारण्यात आले आहे.
-डॉ. प्रदीप गोसावी, वैद्यकीय अधिकारी