पर्यटनाच्या माध्यमातून जुन्नरचा शाश्वत विकास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटनाच्या माध्यमातून 
जुन्नरचा शाश्वत विकास
पर्यटनाच्या माध्यमातून जुन्नरचा शाश्वत विकास

पर्यटनाच्या माध्यमातून जुन्नरचा शाश्वत विकास

sakal_logo
By

महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका म्हणून राज्य सरकारने जुन्नर पर्यटन तालुका म्हणून जाहीर केला आहे. शेती हाच मुख्य व्यवसाय असलेल्या जुन्नरमध्ये औद्योगीकरण नसल्याने पर्यटनाच्या माध्यमातून जुन्नरचा शाश्वत विकास अपेक्षित आहे.

- दत्ता म्हसकर, जुन्नर

जुन्नर तालुक्यामधील विविध धार्मिकस्थळे आहेत. त्यात अष्टविनायक ओझर, लेण्याद्री तसेच वडज, धामणखेल, नळावणे कुलदैवत खंडेराय असणारी गावे, निमदरीची महालक्ष्मी रेणुकामाता, ओतूरचे कपर्दिकेश्वर मंदिर, चैतन्य महाराजांची संजीवन समाधी, पारुंडे येथील ब्रह्मनाथ मंदिर, हेमाडपंती कुकडेश्वर मंदिर, आळे येथील रेडा समाधी येथे भाविकांची नेहमी वर्दळ असते. त्यातून धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणात होत असते. सोबतच निसर्ग संपदेने नटलेले दाऱ्या घाट, नाणेघाट, माळशेज घाट, दुर्ग ढाकोबा, कोपरे, चिल्हेवाडीसारख्या भागातील विविधता आणि वैशिष्ठ्यपूर्ण निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत असते. त्यामुळे तालुक्यात वर्षभर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते.
गेल्या काही वर्षात जुन्नरच्या मासवडी, शेंगुळी, मिसळ आणि चिकन व मटण भाकरीची खाद्य संस्कृत पर्यटकांना भावली आहे. आदिवासी लोकजीवनदेखील पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटन विभागाने द्राक्ष, आंबा महोत्सव, रानभाजी, पतंग महोत्सव भरवून पर्यटकांना आकर्षित करण्याचे काम केले आहे.
ऐतिहासिक शिवनेरी तसेच जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी, नारायणगड या गड किल्ल्यावर गिर्यारोहकांबरोबर पर्यटकदेखील साहसी पर्यटनाचा आनंद घेत आहेत. या गडकोटांचे वैभव पुन्हा परत आणण्यासाठी राबणारे गिरिप्रेमीचे हात समाजमाध्यमातून विविध गिरी शिखरे, धबधबे यासाठी दिलेली आपुलकीची हाक युवा पर्यटकांना आकर्षित करत आहे. या परिसरातील आकर्षण बिंदू असणारा खूप मोठा मान मोडी, आंबा अंबिका, भूत लेणी, भीमाशंकर, तुळजा, लेण्याद्री, शिवनेरी येथील बुद्धकालीन, जैन व हिंदू धर्मीय लेणी समूह हा देखील देशी-विदेशी अभ्यासक, पर्यटकांनी गजबजलेला दिसून येत आहे. भारताचे पहिले वनाधिकारी डॉ. अलेक्झांडर गिब्सन यांचे स्मारक, आणे घाटातील नैसर्गिक पूल, खोडद येथील आंतरराष्ट्रीय अवकाश निरीक्षण संस्था पर्यटकांना डोळस पर्यटनाच्या वेगळ्या वाटेवर घेऊन जातात.

वाहतूक व कचऱ्याचा प्रश्न
अनेकदा पर्यटनस्थळी होणारी गर्दी स्थानिक व्यवस्थेवर ताण आणणारी ठरते. जुन्नरमधील महत्त्वाचे रस्ते योग्य प्रकारे रुंद असल्याने वाहतूक समस्या भेडसावत नाही. मोठ्या देवस्थानकडून वाहनतळाची योग्य व्यवस्था केलेली आहे. लहान गावातून अशी व्यवस्था नसल्याने अडचणीत वाढ होते. अनेकदा पर्यटकदेखील बेशिस्त पार्किंग करून अडथळा वाढवितात. पावसाळी पर्यटनासाठी जुन्नरच्या पश्चिम भागात हजारो पर्यटक भेटी देत असतात. त्यामुळे आपसूकच हा ताण येथील व्यवस्थेवर येतो. स्थानिक वनव्यवस्थापन समिती व वन विभागाने पुढाकार घेऊन नाणेघाट, आंबोली येथे प्रवेश शुल्क सुरू केल्याने वाहतूक व्यवस्था व कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. यासाठी पर्यटकाचे जबाबदार वर्तनही तेवढेच आवश्यक आहे. प्रशासनाने स्वयंसेवी संस्थाच्या समन्वयाने या बाबीवर अभ्यास करून कायमस्वरूपी पर्याय काढला पाहिजे.

पर्यावरणपूरक विकास आराखडा हवा
जुन्नर तालुक्यात प्लॅस्टिक बंदीची कडक अंमलबजावणी अपेक्षित आहे. कास पठाराच्या धर्तीवर ऑनलाइन बुकिंग करून नाममात्र प्रवेश शुल्क आकारून प्रवेश बंधनकारक करता येईल. या करिता स्थानिक पातळीवर आपल्या पर्यटनस्थळांचे महत्त्व ओळखून सर्वांनी आपल्या पर्यटनस्थळांच्या नियोजनबद्ध विकास व जपणुकीसाठी प्रयत्न केला पाहिजे. स्थानिक पातळीवर आपल्या पर्यटनस्थळाची योग्य काळजी घेणे, नियोजनपूर्वक विकास करणे, स्थानिक पातळीवर दृष्टीने पर्यावरणपूरक विकास आराखडा तयार करून अमलात आणणे गरजेचे आहे. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून शाश्वत विकास साधला जाईल, यात शंका नाही.