
जुन्नरला रोहयो कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी
जुन्नर, ता.१९: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये काम करणारे सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहायक, लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यासाठी बुधवारी (ता. १८) केलेल्या राज्यव्यापी संपात जुन्नर तालुक्यातील सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहायक व लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर सहभागी झाले होते. सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्या संप यशस्वी झाला आहे.
जुन्नर तालुक्यातील ११० रोजगार सेवकांनी या संपाला पाठिंबा जाहीर दिला. मागण्या पूर्ण न झाल्यास २५ जानेवारीपासून असहकार आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या विषयी मागण्यांचे निवेदन जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस तसेच गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांना देण्यात आले. यावेळी सहायक कार्यक्रम अधिकारी दुर्गेश गायकवाड, तांत्रिक सहायक जितेंद्र भोर, संचित कोल्हे, मयूर डोके, राजू कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.
विकास कामांवर रोजगार सेवकांना सहा टक्के मानधन मिळते. दहा ते बारा वर्षे काम करूनही सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहायक व लिपिक यांना मिळणारे मानधन अतिशय तुटपुंजे असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेले कर्मचारी गेल्या बारा वर्षांपासून प्रामाणिकपणे रोहयोची कामे करत आहेत. कोविड काळात नियमित कार्यरत राहून रोहयो अंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करून दिली. असे असताना तीन ते चार वर्षांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांना मानधन वेळेवर दिले नाही तसेच वाढवूनही दिले जात नाही. सीएससी मार्फत नियुक्त करण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांना किमान वेतन व वैधानिक फायदा दिला जात नाही. त्यामुळे मनरेगांतर्गत स्वतंत्र यंत्रणा तयार करून कर्मचाऱ्यांचे आकृतिबंधामध्ये समायोजन करण्यात यावे आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.