शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य कारभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य कारभार
शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य कारभार

शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य कारभार

sakal_logo
By

जुन्नर/ओझर, ता. १९ : श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्ती आणि युक्ती या दोन शस्त्रांचा वापर करून स्वराज्य निर्मिती केली. रयतेच्या हितासाठी शिवाजी महाराजांनी कोणतीही तडजोड केली नाही. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राज्य सरकार कारभार करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले शिवनेरी येथे व्यक्त केले.
शिवजयंतीनिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित अभिवादन सभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, भाजप नेत्या आशा बुचके आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘सर्वत्र शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असून संपूर्ण महाराष्ट्र शिवमय झाला आहे. महाराजांच्या आदर्श राज्यकारभारामुळे जगभरातील परकीय राजवटींच्या माना छत्रपतींपुढे झुकल्या. यंदा आग्रा येथील दिवान- ए- आममध्ये शिवजयंती उत्सव साजरा होत आहे, ही बाब सर्वांसाठी आनंददायी आहे.’’
स्वराज्यातील सर्व गडकोटांचा विकास व्हावा या युवराज छत्रपती संभाजी राजांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांच्या सूचना जनहितासाठी आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून इतिहास जतन करण्याचं काम सुरू आहे. शिवनेरी किल्ल्याचा विकास दर्जेदार पद्धतीने पूर्ण होईल. वढू तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘छत्रपती शिवरायांमुळे आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेत मानाने जगत आहोत. किल्ले शिवनेरीवर येणाऱ्या शिवभक्तांची अडवणूक होणार नाही याची खबरदारी राज्य सरकार भविष्यकाळात निश्चित घेईल. दरवर्षी गडकोटांच्या संवर्धनासाठी ३ टक्के निधी राखून ठेवण्यात येणार आहे. स्वराज्य स्थापनेला ३५० वर्ष पूर्ण होत असल्याने यानिमित्ताने महाराजांचे विचार घराघरांत पोचविण्यासाठी शासनाने कार्यक्रम हाती घेतला आहे.’’
यंदाचा शिवनेर भूषण व छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कारार्थींच्या नावाचे वाचन आमदार अतुल बेनके यांनी केले. मंत्री महोदयांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. शिवनेर भूषण पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील आयर्न मॅन मंगेश कोल्हे, संदेश भोईर यांना प्रदान करण्यात आला. तसेच दिवंगत नामदेव महाराज घोलप यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आला. दुर्गसंवर्धक व शिवाजी ट्रेलचे संस्थापक मिलिंद मधुसूदन क्षीरसागर यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी शिवचरित्रातून काही शिकावे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. बिबट सफारीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी माजी आमदार शरद सोनवणे यांनी केली. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजय घोगरे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. रूपेश जगताप यांनी सूत्रसंचालन केले.


शिवभक्तांना शिवजन्मस्थानी दर्शन घेता यावे : संभाजीराजे
सर्वसामान्य शिवभक्तांसमवेत खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे चालत गडावर आले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना व्यासपीठावर येण्याची वारंवार विनंती केली. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांनी सामान्य शिवभक्तांसोबत राहून आपल्या भावना व्यक्त केल्या. संभाजीराजे म्हणाले, ‘‘सर्वांना छत्रपती शिवरायांचे दर्शन घेण्याचा अधिकार आहे. परंतु, शासकीय कार्यक्रमामुळे सर्वसामान्य शिवभक्तांची अडवणूक केली जाते. शासकीय कार्यक्रम अवश्य करा पण दुजाभाव नको, वैयक्तिक पास कशासाठी? पुरातत्त्व विभाग सर्वसामान्यांना शिवजन्मस्थळी जाऊ देत नाही मग तुम्हाला परवानगी कशी?’’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरवू दिले नाही. मंत्री महोदयांनी चालत गडावर यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

04949