
शिवनेरीवर विविध पुरस्कारांचे वितरण
जुन्नर, ता. २० : किल्ले शिवनेरी परिसर विकास मंडळाच्या वतीने शिवजयंतीला देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रीगणाच्या उपस्थितीत झाले.
या वर्षीच्या शिवनेरी भूषण पुरस्कार आयर्नमन मंगेश चंद्रचूड कोल्हे, क्रीडापटू संदेश नामदेव भोईर तसेच नामदेव महाराज घोलप यांना (मरणोत्तर) प्रदान केला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार ‘शिवाजी ट्रेल’चे अध्यक्ष दुर्गसंवर्धक मिलिंद मधुकर क्षीरसागर यांना देण्यात आला. पुरस्कारथींच्या नावाचे वाचन आमदार अतुल बेनके यांनी केले.
यावेळी वनविभागातील उत्कृष्ट सेवेबद्दल राज्य शासनाचे सुवर्णपदक मिळविलेले जुन्नर वनविभागातील सेवानिवृत्त वनमजूर धोंडिबा यमनाजी कोकणे यांचा विशेष सन्मान केला. बिबट निवारा केंद्राच्या स्थापनेपासून बिबट्या सोबत राहणारे त्यांच्याशी एकरूप झालेले कोकणे यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला.
यावेळी पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, भाजप नेत्या आशा बुचके आदी मान्यवर उपस्थित होते.
किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) : सुवर्णपदकप्राप्त धोंडिबा कोकणे यांचा विशेष सन्मान करताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवर.