
जुन्नरच्या बिबट सफारीचा मार्ग मोकळा
जुन्नर, ता. १० : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी होणार असल्याचे जाहीर केल्याने राजकीय श्रेयवादात अडकलेल्या बिबट सफारीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील पहिला पर्यटन तालुका असणाऱ्या जुन्नर तालुक्यात प्रत्यक्षात बिबट सफारी कोठे व केव्हा सुरू होणार, याची उत्सुकता वाढली आहे.
देशातील पहिली बिबट सफारी राज्य सरकारने मंजूर केली आहे. सर्वांच्या एकजुटीमुळे हा सुवर्णक्षण साकारला आहे. याबद्दल राज्य सरकार व जुन्नरमधील नागरिकांचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी आभार मानले.
तसेच, आमदार अतुल बेनके यांनी बिबट सफारीची घोषणा केल्याबद्दल सरकारचे आभार मानले. तसेच, प्रकल्प जाहीर झाला, पण त्यावर निधी अजून पडला नाही. लवकरात लवकर तो निधी पडावा आणि काम लवकर सुरू व्हावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
शिवजन्मभूमीमध्ये बिबट सफारी व्हावी, यासाठी माजी आमदार सोनवणे हे सुरवातीपासून आग्रही होते. ही सफारी आंबेगव्हाण येथेच व्हावी व जुन्नरच्या पर्यटन वाढीसाठी सफारीसाठी ८० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करून हा प्रकल्प पूर्ण करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना २२ फेब्रुवारी रोजी पाठवलेल्या पत्रात सोनवणे यांनी केली होती. तसेच, राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ मार्च रोजी पत्राद्वारे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना या पथदर्शी प्रकल्पाच्या पूर्ततेबाबत कार्यवाही करावी, अशी विनंती केली होती.
जुन्नर वनविभागाने बिबट सफरीची जागा निश्चित करण्यासठी मार्च २२ मध्ये नऊ सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीने प्राथमिक स्तरावर पाच जागांचे सर्वेक्षण केले होते. यातील आंबेगव्हाण व कुरण ही दोन स्थळे अनुकूल असल्याचे अहवालात नमूद केले होते. जिओ इंजिनिअर्स संस्थेने कुरण व खानापूर परिसरात ६ मे २२ रोजी सर्वेक्षण केले होते. या अहवालात आंबेगव्हाणपेक्षा कुरणच्या स्थळास पर्यटन स्थळे जवळ असल्याने व खर्च कमी येणार असल्याने अनुकूलता दर्शवली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ सप्टेंबर २२ रोजी वन विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कुरणऐवजी आंबेगव्हाण येथील बिबट सफारीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार वनविभागाने आंबेगव्हाण येथील बिबट सफारीचा फेरप्रस्ताव पाठवीला होता. आंबेगव्हाण येथील बिबट सफारीस कुरणच्या तुलनेत २५ टक्के जास्तीचा खर्च व कालावधी लागणार असल्याचे प्रस्तावात म्हटले होते.
सभागृहात मांडलेली लक्षवेधी
जुन्नर तालुक्यात बिबट सफारीचा प्रकल्प मंजूर करण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी केली होती. याबाबत सभागृहात लक्षवेधी सूचना मांडली होती. महाविकास आघाडी सरकारने बिबट सफारी प्रकल्पास मान्यता दिली होती. बिबट सफारीसाठी जागेच्या सर्वेक्षणासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने निधी मंजूर करून दिला होता. तसेच, सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यासाठी तातडीचे पावले उचलली होती.