
बेकायदा माती उत्खननावर कारवाई करा
जुन्नर, ता.१५ : जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात काही दिवसांपासून बेकायदा माती उत्खनन तसेच वाहतूक सुरू आहे. यामुळे या परिसरातील निसर्गाला धोका निर्माण होत असून, महसूल विभागाने याविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष बाळासाहेब धराडे यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन तहसीलदार रवींद्र सबनीस यांना देण्यात आले आहे. यावेळी बिरसा ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवाजी मडके, संजय भांगे, संजय मोधे, शुभम भवारी, देवराम डावखर, गणेश सुदर्शन धराडे, तुषार डावखर, शुभम उंडे, रोहिदास म्हसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जुन्नर तालुक्यातील ६५ गावे अनुसूचित (पेसा) क्षेत्रात येत आहेत. या क्षेत्रात ग्रामसभांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. या क्षेत्रातील गौण खनिजासाठी ग्रामसभांची परवानगी घेणे आवश्यक असताना अनेक गावांत अवैध माती उत्खनन व वाहतूक केली जात आहे. जळवंडी व उंडेखडक या दोन ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांची माती उत्खनन व वाहतुकीसाठी ग्रामसभेने परवानगी दिलेली आहे. खडकुंबे येथे परवानगी घेतलेले गट नंबर व माती उत्खनन होत असलेले गट नंबर वेगळेच आहेत. माती उत्खनन पारंपरिक पद्धतीने केले जात नसून अनेक ठिकाणी जेसीबी यंत्राच्या मदतीने उत्खनन केले जात आहे. रात्रीच्या वेळी माती वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे. माती वाहतूक मरताना कोणतीही दक्षता घेतली जात नाही. या बाबींकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.