
जुन्नरच्या अर्थसंकल्पात आरोग्यावर भर
जुन्नर, ता. १५ : कोणतीही करवाढ नसलेला जुन्नर नगर परिषदेचा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा शिलकी अर्थसंकल्प प्रशासकीय सभेत मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी दिली. शहरातील नागरिकांच्या स्वास्थ्य संरक्षण व आरोग्य यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला असून, यासाठी पर्यावरण नियंत्रण उपाय योजनेकरिता ४० लाख तरतूद केली आहे. यंदाचा १९ लाख ४७ हजार रुपये शिलकी अर्थसंकल्पात कोणतेही करवाढ नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
जुन्नर नगर परिषदेच्या सन २०२३-२४ आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकीय अर्थसंकल्पास प्रशासकीय सभेत उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक सारंग कोडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली मंजुरी देण्यात आली. हा अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. नगर परिषदेच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या प्रशासकीय सभेत मुख्याधिकारी देवरे व लेखापाल प्रवीण कापसे यांनी सभेपुढे आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.
अर्थसंकल्प दृष्टीक्षेपात
अंदाजपत्रकीय तरतूद : १०२.०६ कोटी रुपये
आरंभीची शिल्लक : १.७० कोटी रुपये
महसुली जमा : २३.६० कोटी रुपये
भांडवली जमा : ७६.९४ कोटी रुपये
एकूण अपेक्षीत जमा : १००.५४ कोटी
महसुली खर्च : ७६.९४ कोटी
भांडवली खर्च : ७८.६७ कोटी
अखेरची शिल्लक : १९.४७ कोटी
अपेक्षीत उत्पन्न
संकलित कर १ : ३.५० कोटी रुपये
पाणीपट्टी : १.५० कोटी रुपये
बांधकाम विकास शुल्क : १.०० कोटी रुपये
नगरपालिका सहाय्यक अनुदान : ८.५० कोटी रुपये
सर्वसाधारण स्वच्छता कर : ३५.०० लाख रुपये
विशेष उल्लेखनीय बाबी
- जुन्नर शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी अर्थसंकल्पात अमृत २.० अभियानाअंतर्गत माणिकडोह धरण ते जुन्नर बंद जलवाहिनीतून पाणी आणण्यासाठी २२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
- जुन्नरजवळील ऐतिहासिक पद्मावती तलाव पुनर्जिवीकरण व सुशोभीकरण योजनेकरिता १५ कोटीची तरतूद केली आहे.
- स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत जुन्नर शहर भुयारी गटर व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी १० कोटीची व महिला व दुर्बल घटकातील नागरिक व दिव्यांग नागरिकांकरिता प्रत्येकी १५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.