राजूर येथे आयुर्वेदिक उपचार घेण्यास रुग्णांची पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजूर येथे आयुर्वेदिक उपचार घेण्यास रुग्णांची पसंती
राजूर येथे आयुर्वेदिक उपचार घेण्यास रुग्णांची पसंती

राजूर येथे आयुर्वेदिक उपचार घेण्यास रुग्णांची पसंती

sakal_logo
By

दत्ता म्हसकर : सकाळ वृत्तसेवा
जुन्नर,ता.२१ : आदिवासी भागातील राजूर नंबर दोन (ता. जुन्नर) येथील आयुष आरोग्यवर्धिनी केंद्रात ''सुंदर माझा दवाखाना उपक्रम'' राबविण्यात येत आहे. येथील आरोग्य केंद्राची आकर्षक इमारत, धन्वंतरी औषधी वनस्पती उद्यान, वैद्यकीय उपचार सुविधा यामुळे रुग्णांचा कल आयुर्वेदिक उपचार घेण्याकडे वाढला आहे. आरोग्य केंद्रात दर महिन्याला सरासरी ३००-३५० रुग्ण आयुर्वेद उपचार घेतात.

राजूर येथील केंद्रात एक वैद्यकीय अधिकारी तसेच प्रत्येकी एक आरोग्य सेविका, औषध निर्माता व परिचर असे पाच कर्मचारी काम पाहतात. सामान्य आजारासाठी आवश्यक औषधे तसेच आयुर्वेदिक औषधी उपलब्ध आहेत. राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत बाह्यरुग्ण स्तरावर आयुर्वेदिक पंचकर्म तसेच प्राणायाम व योगा यासेवा दिल्या जातात. तसेच गरोदरमाता व बालकांची तपासणी व लसीकरण सेवा पुरविली जाते. उच्चरक्तदाब व मधुमेह रुग्णांची तपासणी व औषधोपचार करण्यात येतात. तसेच आयुर्वेदिक औषधोपचार व पंचकर्म उपचार, योगा व प्राणायाम, निरोगी जीवनशैली बाबत मार्गदर्शन, संसर्गजन्य, असंसर्गजन्य आजार निदान उपचार,गरोदरमाता व बालकांच्या सेवा आदी सेवा सुविधा उपलब्ध असल्याचे डॉ.प्रदीप गोसावी यांनी सांगितले.
तालुका आरोग्य अधिकारी वर्षा गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात ५८ नेत्ररुग्णांची तपासणी व ४ रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. महिला आरोग्य तपासणी शिबिर ८० महिलांची आरोग्य तपासणी केली. आयुर्वेदिक अग्निकर्म व विध्द कर्म शिबिर १३३ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

पंचकर्म उपचारासाठी अल्युमिनियमचे पार्टिशन
शासकीय निधीतून इमारतीचे रंगकाम करण्यात आले आहे. आरोग्य केंद्र परिसरात स्वच्छता राखली जाते. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ग्रामस्थ व कर्मचारी यांनी श्रमदानातून औषधी वनस्पती लागवड, सुशोभिकरणाचे चांगले काम केले आहे. ग्रामपंचायतीने पेसा निधीतून रुग्णांना बसण्यासाठी बाक तसेच पंचकर्म उपचारासाठी अल्युमिनियमचे पार्टिशन करून दिले आहे.
केंद्र इमारतीत योग,प्राणायाम, आयुर्वेद औषधी वनस्पती माहितीचे तसेच शासनाच्या विविध योजनांचे माहिती दर्शक पोस्टर्स व फलक लावण्यात आले आहेत.


ग्रामस्थांना आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा चांगला लाभ होत आहे. मधुमेह व रक्तदाबाच्या रुग्णांना योग्य औषधोपचार मिळतात. परिसर नेहमी स्वच्छ असतो. रुग्णांना चांगली वागणूक मिळते. आरोग्य सेवेविषयी ग्रामस्थ समाधानी आहेत.
- ज्योत्स्ना मुंढे, सरपंच

डॉ.गोसावी यांनी दिलेल्या अग्निकर्म उपचार पद्धतीने खांदे दुखी निम्मी कमी झाली.
- वसंत मुंढे, एक रुग्ण


05190, 05191