
जुन्नरला विविध लाभाच्या दाखल्यांचे वितरण
जुन्नर,ता. ८ : ''शासन आपल्या दारी''उपक्रमाचा जुन्नर तालुक्यातील सुमारे २६ हजार ३६५ नागरिकांना लाभ मिळाल्याची माहिती प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली.
बारव (ता.जुन्नर) येथील आदिवासी प्रबोधिनी येथे सर्व शासकीय विभागामार्फत विविध लाभाच्या योजनेअंतर्गत दाखल्यांचे वितरण बुधवारी (ता.७) करण्यात आले. यात विशेष आदिम कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना १७ जातीचे दाखले देण्यात आले.
जुन्नर तहसील कार्यालयामार्फत तालुक्यात १५ एप्रिल ते १५ जून दरम्यान ''शासन आपल्या दारी'' हा उपक्रम राबविण्यात आला होता. यात विविध जातीचे दाखले, दुबार शिधापत्रिका, सातबारा -८ अ, फेरफार उतारे, जन्म-मृत्यू दाखले, डोंगरी, नॉन क्रिमिनल तसेच उत्पन्न दाखले तसेच आरोग्य, कृषी व निवडणूक विभागाच्या योजनांच्या दाखल्याचा समावेश आहे.
शासनाच्या विविध योजना अधिकाधिक गरजू-लाभार्थ्यांपर्यंत पोचवण्याचे काम शासकीय यंत्रणा करत आहेत. यासाठी जुन्नर तालुक्यातील सर्व महसूल मंडळात पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे असे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, या वेळी राज्यातील शिंदे सरकारचे लोकांना मदत करण्यापेक्षा जाहिरात बाजीकडे अधिक लक्ष देत असल्याची टीका आमदार बेनके यांनी केली. महानेट योजनेत ग्रामपंचायतींना इंटरनेट उपलब्ध करून देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही पंचायतींना त्याचा लाभ मिळत नसल्याचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी सांगितले.
सुनीता वामन यांनी सूत्रसंचालन केले. नायब तहसीलदार प्रवीण कोटकर यांनी आभार मानले.
यावेळी आमदार अतुल बेनके, प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, मुख्याधिकारी मंगेश देवरे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, दूध संघाचे संचालक भाऊसाहेब देवाडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष पापाशेठ खोत,माऊली खंडागळे गुलाब पारखे आदी मान्यवर व लाभार्थी उपस्थित होते.
05353