पुरामुळे खळदकरांनी रात्र काढली जागून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरामुळे खळदकरांनी रात्र काढली जागून
पुरामुळे खळदकरांनी रात्र काढली जागून

पुरामुळे खळदकरांनी रात्र काढली जागून

sakal_logo
By

खळद ता. १८ : ''काळ आला होता, पण वेळ आली नव्हती'' यामुळे आम्ही वाचलो अशी संतप्त भावना व्यक्त करत आता तरी प्रशासनाने जागे व्हा, आमचा विचार करा, आमचे माळीण होण्याची वाट पाहू नका, अशी मागणी खळद (ता.पुरंदर) येथील नागरिकांनी केली.
पुरंदर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे क-हा नदीला प्रचंड असा महापूर आला होता. या महापुराने खळद गावामध्ये पाणी शिरल्याने नागरिक धास्तावले होते व भयभीत नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली.
तालुक्यात झालेल्या पावसाने क-हा नदीच्या पात्राच्या पाण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ झाली व हे पाणी रात्री१ वाजण्याच्या सुमारास गावामध्ये शिरले व गावचा चव्हाणवस्ती, घोडके मळा, खंडोबाचीवाडी या वाड्यावस्त्यांचा तर एखतपूर-मुंजवडी सह अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे बंद झाला. यामुळे नागरिकांना सोईस्कररीत्या बाहेर पडता येत नव्हते अशा भयभीत वातावरणातच नागरीकांनी ही रात्र पूर्णपणे जागून काढली.
मुसळधार पावसाने गावामध्ये शेती पिकांसह कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांसारख्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. याबाबत तहसीलदार रूपाली सरनोबत, तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव, कृषी पर्यवेक्षक प्रवीण अडसूळ यांनी गावाला भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली व नुकसानी बाबत शासनाकडे अहवाल पाठविला जाईल असे सांगितले.

ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांनी तातडीने गावचे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्याशी संपर्क करून आपले पंचनामे करून घ्यावेत जेणेकरून त्यांना नुकसान भरपाई देण्यास मदत होईल.
- रूपाली सरनोबत, तहसीलदार पुरंदर.

गावाच्या बाजूने कऱ्हा नदी वाहत असून संपूर्ण गावाला मोठ्या प्रमाणावरती धोका संभवतो, येथे संरक्षक भिंत होणे गरजेचे आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, माजी आमदार विजय शिवतारे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरंगे, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते यांच्यासह अनेक मान्यवरांना वारंवार पत्र व्यवहार करून संरक्षण भिंतीची मागणी केली आहे."
योगेश कामथे, ग्रामपंचायत सदस्य, खळद.

01714