रोहित्रांमधील तारा चोरणारी टोळी जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोहित्रांमधील तारा चोरणारी टोळी जेरबंद
रोहित्रांमधील तारा चोरणारी टोळी जेरबंद

रोहित्रांमधील तारा चोरणारी टोळी जेरबंद

sakal_logo
By

खळद, ता. २८ : पुरंदर व भोर तालुक्यातील आणि सातारा जिल्ह्यातील महावितरण कंपनीचे विद्युत रोहित्रांमधील तांब्याच्या तारा चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले.
भोर व पुरंदर तालुक्यात महावितरण कंपनीचे विद्युत रोहित्र फोडून त्यामधील तेल बाहेर फेकून तांब्याच्या तारा बाहेर काढून चोरून नेले जात होते. त्यामुळे त्या ठिकाणाच्या परिसरात विजेचा पुरवठा खंडित होऊन त्याचा त्रास नागरिक विशेषतः तेथील शेतकरी वर्गास होत होता. त्यामुळे सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक राहुल गावडे, पोलिस हवालदार सचिन घाडगे, दत्तात्रेय तांबे, विजय कांचन, मुकुंद कदम, अजित भुजबळ, पोलिस कॉन्स्टेबल धिरज जाधव, समाधान नाईकनवरे, अमोल शेडगे यांचे पथक तयार केले होते.
या पथकास तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल रेहमान खान (रा. उत्तर प्रदेश) हा भंगारवाला त्याच्या साथीदाराचे मदतीने विद्युत रोहित्र फोडून त्यामधील तांब्याच्या तारा चोरी करीत असल्याचे समजले. त्यानुसार या पथकाने खान यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे मित्र व कामगाराच्या मदतीने विद्युत रोहित्रामधील तांब्याच्या तारा चोरी करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर या पथकाने त्याचे साथीदार इमामउददीन शाहाबउददीन खान (वय २४), जावेद हदीस खान (वय ३१), सतराम रामदुलारे चौहान (वय २४), शफीक अहमद अब्दुलरहीम खान (वय ३३, सर्व रा. तुलसीपूर, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश, सध्या सर्व रा. नऱ्हे- आंबेगाव, पुणे) यांना ताब्यात घेतले.
या आरोपींकडे पुणे ग्रामीणमधील चोरीस गेलेल्या विद्युत रोहित्राची स्वतंत्रपणे सखोल चौकशी केली असता त्यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यात १४ ठिकाणी व सातारा जिल्ह्यामधील २२ ठिकाणी, असे वेगवेगळ्या ठिकाणी एकूण ३६ ठिकाणी ४१ विद्युत रोहित्र फोडून त्यामधील तांब्याच्या तारांची चोरी केल्याचे सांगितले. यामधील सर्व आरोपींना गुन्ह्यांचे पुढील तपासकामी सासवड पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.