पुरंदरच्या डंकावाल्या मनीषाचा जगभर डंका घुमणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरंदरच्या डंकावाल्या मनीषाचा जगभर डंका घुमणार
पुरंदरच्या डंकावाल्या मनीषाचा जगभर डंका घुमणार

पुरंदरच्या डंकावाल्या मनीषाचा जगभर डंका घुमणार

sakal_logo
By

खळद, ता. १० : शिवरी (ता. पुरंदर) येथील गृहिणी मनीषा संतोष कामथे या आपल्या परिस्थितीवर मात करून बचत गटाच्या माध्यमातून घरगुती पारंपरिक पदार्थ बनवित आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती मोठी भरारी घेतली आहे. याची दखल संयुक्त राष्ट्रसंघाने घेत जागतिक महिला दिनानिमित्त जगातील दोनशे देशांमध्ये मनीषा यांची यशोगाथा जगभर पोहचवणार आहे.
सावंतवाडी (ता. बारामती) येथील मूळ रहिवासी असणारी मनीषा ही लग्न करून शिवरी येथे २१ वर्षांपूर्वी आली. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेली मनिषा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना शेती व्यवसायावरती मुलांचे शिक्षण होणे अवघड झाले होते, अशा परिस्थितीमध्ये शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून आपल्या मावस बहिणीच्या सल्ल्याने मनीषाने २०१९मध्ये मसाला कुटण्याचा डंका व्यवसाय सुरू केला. सुरुवातीचे काही महिने आलेल्या ग्राहकांचे मसाले कुटून देण्याचे काम त्यांनी केले. याच वेळी ग्राहकांच्या मागणीनुसार मसाल्यासाठी आवश्यक असणारी सर्व साहित्य ठेवण्यास त्यांनी सुरुवात केली. यालाही मोठी मागणी वाढल्यानंतर मसाल्याबरोबर इतर पदार्थही आपल्याकडे असावेत यासाठी ग्राहकांच्या मागणीनुसारच त्यांनी शेवई मशिन खरेदी करून आपला व्यवसाय सुरू केला. यामध्ये ग्राहकांना शेवई व मसाला करून देता देता त्यांनी याची विक्री देखील सुरू केली यालाही ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
यानंतर शिवरी येथे महिला बचत गटांसाठी २०२१मध्ये बँक ऑफ बडोदाच्या वतीने दहा दिवसाचा आरटीसी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये जवळपास ४० प्रकारचे मसाले, लोणचे, पापड, शेवया बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले व याच प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन बचत गटाच्या माध्यमातून एचडीएफसी बँकेतून एक लाख रुपयाचे कर्ज काढून मनिषा यांनी आपले दुसरे युनिट सुरू करत व्यवसायाला आपली एक वेगळी दिशा दिली. या माध्यमातून चार प्रकारचे लोणचे, दोन प्रकारच्या शेवई, सांडगे, पापड, उन्हाळी सर्व पदार्थ यामध्ये कुरडई, पापडी, खिच्चे, बटाटा वेफर्स, खारवडे व अन्य उन्हाळी पदार्थ बनवण्यास सुरुवात केली. याबरोबर मसाले बनवण्याचे काम जमोत सुरू होते.
९ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांचा हा व्यवसाय बारामती ॲग्री या गटाला जोडण्यात आला. या गटाच्या माध्यमातूनच मनिषा यांची फार्म दीदी या संस्थेची ओळख झाली. फार्म दीदी संस्थेच्या प्रतिनिधींनी त्यांच्या युनिटला भेट दिल्यानंतर आमच्यासाठी पदार्थ बनवताल का असे विचारून त्यांना एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली. यानंतर त्यांनी लगेचच होकार देत त्यांचे ट्रेनिंग घेऊन पदार्थ बनवण्यास सुरुवात केली. आपल्या इतर पदार्थांबरोबरच सध्या फार्म दीदीसाठी त्या लसूण लोणचे, लसूण चटणी, लिंबू मिरची लोणचे, चिली आदी पदार्थ बनवतात. सुरुवातीला त्यांना पंधरा दिवसाची ऑर्डर ५० ते ६० किलोपर्यंत होती. आता जवळपास ७०० ते ८०० किलो पर्यंत ऑर्डर दर पंधरा दिवसाला मिळू लागली असून आणखी ऑर्डर वाढवणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात येत आहे.
या माध्यमातून त्यांना चांगले उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली असून या संस्थेच्या माध्यमातून गेल्या आठ महिन्यांमध्ये त्यांना जवळपास साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे त्या आवर्जून सांगतात. तर आपला ग्रामविकास स्वयंसहायता बचत गट गेली २५ वर्षापासून शिवरीमध्ये कार्यरत असून आपल्या सासूबाई या गटाच्या सदस्या होत्या. पुढे सासूबाईंच्या नावावरती मनीषा यांना त्या गटात सभासदत्व दिले व आज याच गटातील अन्य महिलांनाही मनीषा आपल्या बरोबरच व्यवसायाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत असून त्यांच्या कडूनही त्या इतर पदार्थ बनवून घेत आहेत. तर फॉर्म दीदीची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी सध्या त्यांच्याकडे सहा ते सात महिला नियमित काम करत असल्याने त्यांनी रोजगाराच्याही वाटा उपलब्ध केल्या आहेत. तर फार्म दीदी सोडून इतरत्रही आपले पदार्थ विक्री व्हावी यासाठी बारामती येथील कृषक प्रदर्शन, पुणे येथील गोळीबार मैदानावरती झालेले दख्खनची यात्रा प्रदर्शन या ठिकाणी त्यांनी आपल्या स्टॉलच्या माध्यमातून मोठी विक्री केली आहे.
फार्म दीदी संस्थेला मनीषा कामथे पुरवत असलेल्या पदार्थांमुळेच संयुक्त राष्ट्र संघाकडून या संस्थेला विशेष पुरस्कार मिळाला असून या पुरस्काराच्या खऱ्या मानकरी या मनीषा कामथेच असल्याचे सांगत या संस्थेच्या वतीने मनीषा यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या युनिटने पाहणी करीत त्यांची संघर्ष गाथा जाणून घेतली. संघर्षगाथा आता यशोगाथा म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त जगातील दोनशे देशांमध्ये आठ मार्च रोजी प्रसारित होणार आहे. यामुळे पुरंदरच्या डंकावाल्या मनीषाचा डंका हा जगातील दोनशे देशापर्यंत आता पोहोचणार आहे. त्यांच्या या प्रवासात त्यांचे पती संतोष कामथे, कुटुंबीय, बचत
गटातील सर्व महिलांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे त्या आवर्जून सांगतात.