पुरंदरमधील शेती होणार विषमुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरंदरमधील शेती होणार विषमुक्त
पुरंदरमधील शेती होणार विषमुक्त

पुरंदरमधील शेती होणार विषमुक्त

sakal_logo
By

खळद, ता. ७ : उत्पादन वाढीसाठी बेसुमार रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वापर वाढू लागला आहे. त्यातून जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांची हानी होऊन जमिनीची सुपीकता कमी व रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत तर शेतकऱ्यांना शेती करणेही कठीण होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर पुरंदरमध्ये विषमुक्त शेती होण्यासाठी नैसर्गिक शेती कार्यशाळेचे आयोजन करणार आहे, अशी माहिती सेवानिवृत्त सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना झेंडे यांनी पुरंदर तालुक्यामध्ये विषमुक्त शेती व्हावी यासाठी ही कार्यशाळा होणार असून यामध्ये महाराष्ट्र शासन, सदाशिवआण्णा झेंडे चॅरिटेबल ट्रस्ट, इस्कॉन संस्था व प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय यांच्या वतीने संयुक्तरित्या या कार्यक्रमाचे आयोजन होत असून यामध्ये पुरंदर तालुक्यातील जवळपास १००० प्रयोगशील शेतकऱ्यांना एकत्रित करून लवकरच हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सासवड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी कृषी सहसंचालक सुनील बोरकर, तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव, सासवड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्व विद्यालयाच्या नीलिमा दीदी उपस्थित होत्या.

कार्यशाळेचा उद्देश
* रासायनिक खतावरचा खर्च कमी करणे
* जमिनीची सुपीकता वाढवून उत्पादन वाढवणे
* पुरुदंरमधील प्रशिक्षित, प्रगतशील शेतकरी तयार करणे
* शेतकरी नैसर्गिक शेतीचे कमी खर्चिक प्रयोग राबविणे.

एक दिवशीय कार्यशाळेत तालुका कृषी विभागाकडून इच्छुक शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर यशस्वी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन दिले जाणार असून, पुढील तीन वर्षे कृषी विभागाकडून मार्केटिंगसह नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन सहभागी शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.
- सुनील बोरकर, कृषी सहसंचालक

कार्यशाळेसाठी तालुका कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षकांमार्फत गावोगावी शेतकऱ्यांची ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने नोंदणी केली जाणार असून शेतकरी गट बनवले जाणार आहेत व समूह शेती पद्धतीने नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन केले जाणार आहे.
-सूरज जाधव, कृषी अधिकारी