दुर्गामाता दौडमधील जयघोषाने कडूस परिसर दुमदुमतोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्गामाता दौडमधील जयघोषाने 
कडूस परिसर दुमदुमतोय
दुर्गामाता दौडमधील जयघोषाने कडूस परिसर दुमदुमतोय

दुर्गामाता दौडमधील जयघोषाने कडूस परिसर दुमदुमतोय

sakal_logo
By

कडूस, ता. ३ ः ''छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषासह ''हिंदू धर्म की जय'', ''दुर्गामाता की जय''च्या घोषणा व हर हर महादेवच्या ललकाऱ्यांनी कडूस (ता. खेड) पंचक्रोशी गेल्या सात दिवसांपासून पहाटेच्या वेळी दुमदुमून जात आहे. नवरात्रोत्सवानिमित्त परिसरातील तरुण-तरुणींनी सुरू केलेल्या श्री दुर्गामाता दौडला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
हिंदू धर्म जनजागृती व हिंदू चालीरीती तसेच परंपरांना उजाळा देण्यासाठी कडूस पंचक्रोशीतील तरुण-तरुणींनी नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गामाता दौडचा उपक्रम सुरू केला आहे. दुर्गामाता दौडच्या निमित्ताने गेल्या सात दिवसांपासून दररोज पहाटेच्या सुमारास पंचक्रोशीतील तरुण-तरुणी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात एकत्र जमत आहेत. पहाटेच्या वेळी ध्वजपूजन, प्रतिमापूजन व शस्त्रपूजन करून दौडीस प्रारंभ केला जातो. परिसरातील वाड्यावस्त्यांतील विविध भागांमध्ये ध्येयमंत्र व प्रेरणागीते म्हणत दौड मार्गस्थ होत असते. अग्रस्थानी हाती भगवा ध्वज घेतलेला तरुण दौडचे नेतृत्व करीत असतो. दौड मार्गस्थ होताना छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जयचा नारा दिला जातो, तर दुर्गामाता, हिंदू धर्माचा जयजयकार केला जात असल्याने परिसर जयघोष व ललकाऱ्यांनी दुमदुमून जात आहे. दिवसेंदिवस दुर्गामाता दौडला प्रतिसाद वाढत आहे. यात डोक्याला फेटे बांधलेल्या व भगवी वस्त्रे परिधान केलेल्या महिला, तरुणी, तरुण, शाळकरी मुले दौडमध्ये सहभागी होत आहे. घरांसमोर रांगोळी काढून ठिकठिकाणी दुर्गामाता दौड आणि भगव्या ध्वजाचे महिलांकडून औक्षण व पूजन करण्यात येत आहे. वेगवेगळ्या वाड्यावस्त्यांवर किंवा तरुण मंडळांच्या नवरात्रोत्सव मंडपात दुर्गामाता पूजन व आरती करून दौडची सांगता केली जात आहे.