भावी सरपंचाने घडविले मतदारांना बालाजीचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भावी सरपंचाने घडविले मतदारांना बालाजीचे दर्शन
भावी सरपंचाने घडविले मतदारांना बालाजीचे दर्शन

भावी सरपंचाने घडविले मतदारांना बालाजीचे दर्शन

sakal_logo
By

कडूस, ता. १३ : निवडणूक कोणतीही असो, निवडून येण्यासाठी मतदारांना नानाविध प्रलोभने दिली जात असल्याचे चित्र काही नवीन नाही. परंतु खेड तालुक्यात मात्र निवडणुकीची घोषणा होण्याअगोदरच एका भावी सरपंचाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशाने जोर लावला आहे. त्याने गावातील सुमारे अर्ध्या अधिक मतदारांना तिरुपती बालाजीच्या दर्शन सहलीसाठी नेले आहे.

पुढील दोन महिन्यात खेड तालुक्यात पंचवीसपेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणूका होणार आहे. शासनाच्या धोरणानुसार पुन्हा जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. या निवडणुका कधी होतील ते सांगता येत नाही. अजून निवडणूक कार्यक्रम जाहीर नाही, पण खेड तालुक्यात मात्र ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या अनेकांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. अनेक भावी सरपंच, सदस्य आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहे. ठेकेदारी करणाऱ्या या भावी सरपंचाने निवडणुकीची तयारी म्हणून मतदारांना खूष करण्यासाठी तीन दिवसांच्या आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजीच्या सहलीवर नेले आहे. गावातील सुमारे साडेपाचशे जणांचे जाण्यायेण्यासह रेल्वेच्या प्रवासाचे स्वखर्चाने बुकिंग केले आहे. सर्वांच्या चहा, नाश्ता, जेवणाची सोय या भावी सरपंचाने केली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मतदार घेऊन जात असल्याने नियोजनात काही ढील राहू नये, म्हणून खास काळजी घेतली आहे. मतदारांना वेळच्यावेळी चहा, नाश्ता, जेवणासह काही खास मतदारांची ''स्पेशल बडदास्त'' ठेवण्याचे नियोजन मित्रांच्या सल्ल्याने केले आहे. सोमवारी दुपारी चार वाजता राजगुरुनगर येथून हा लवाजमा मार्गस्थ झाला. हा सर्व खर्च भावी सरपंचाने केला आहे. निवडणुकीअगोदरच मतदारांना आमिष म्हणून देवदर्शनासाठी सहलीवर नेण्याच्या या प्रकाराची तालुक्यात जोरदार चर्चा झडत आहे. मतदारांना आमिष देऊन गृहीत धरण्याचा हा प्रकार किती यशस्वी होतोय, हे निवडणूक निकालानंतरच समजणार आहे. पण त्यासाठी निवडणूक कार्यक्रम तर घोषित व्हायला पाहिजे ना.