
कारवाईला आले, फुकट घेऊन गेले!
कडूस, ता. १८ : प्लॅस्टिक बंदीवरील कारवाईसाठी पथक आले अन् दिवाळीच्या फुकट खरेदीबरोबर रोख रक्कम घेऊन गेले, असा प्रकार राजगुरुनगर (ता. खेड) शहरात मंगळवारी (ता. १८) घडला. प्लॅस्टिक बंदीवरील कारवाईऐवजी पथकाने केलेल्या फुकटच्या दिवाळी खरेदीचीच चर्चा अधिक झाली.
प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी असूनदेखील राजगुरुनगर शहरात प्लॅस्टिकचा बिनधास्त वापर होत आहे. अनेक कापड दुकानदार, फेरीवाले, भाजीपाला व पथारी व्यावसायिक प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करीत असल्याचे चित्र आहे. याचाच फायदा प्लॅस्टिक वापराच्या बंदीवरील कारवाईसाठी आलेल्या पथकाने मंगळवारी (ता. १८) राजगुरुनगर शहरात घेतला. कारवाईच्या नावाखाली कारवाई पथकाने केलेल्या कारनाम्याचीच चर्चा अधिक झाली. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याऐवजी या दुकानदारांकडून दिवाळीसाठी कपडे व अन्य साहित्यांची फुकटची खरेदी करून घेतली. बंदी असतानाही आपण दुकानात प्लॅस्टिकचा वापर करीत असल्याने दुकानदारांनीसुद्धा या फुकटच्या खरेदीला विरोध केला नाही. प्लॅस्टिक सापडलेल्या अनेक कापड दुकानदारांकडून पाच हजार रुपयांपर्यंतची खरेदी व रोख पाच हजाराची रक्कम व सापडलेले प्लॅस्टिक जप्त केले. या प्रकाराची व्यापारी वर्गामध्ये आपापसांत दबक्या आवाजात चर्चा केली जात आहे, परंतु प्लॅस्टिकवर बंदी असतानाही आपण प्लॅस्टिकचा वापर करीत असल्याने दुकानदारसुद्धा चुप्पी साधून आहेत.
ही कारवाई नगरपरिषदेची होती की राज्य शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाची होती, याबाबत दुकानदारांनाही सांगता आले नाही. याबाबत नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निवेदिता घारगे यांच्याशी भ्रमणध्वनिवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. नुकतीच खेड पोलिसांनी एका तोतया पोलिस अधिकाऱ्याला गजाआड करण्यात यश मिळवले आहे, त्यात ही चर्चा होईल, अशी प्लॅस्टिक बंदीची कारवाई झाली. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर झालेली कारवाई खरी की खोटी, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.