चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने अनर्थ टाळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने अनर्थ टाळला
चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने अनर्थ टाळला

चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने अनर्थ टाळला

sakal_logo
By

कडूस, ता. १२ ः पुणे- नाशिक महामार्गावर खेडच्या घाटातील उतारावरून एसटी चालवत असताना अचानक चालकाला अस्वस्थ वाटू लागले. चक्कर आल्यासारखे झाले, अंगातील शक्ती क्षीण झाली. अचानक ओढवलेल्या प्रसंगातही चालकाने मात्र प्रसंगावधान राखले. अस्वस्थ वाटत असतानाही चालकाने एसटी बस सुरक्षितपणे रस्त्याच्या बाजूला उभी केल्याने अनर्थ टाळला. ही घटना शुक्रवारी (ता. ११) सकाळी दहाच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात घडली.
शुक्रवारी सकाळी पावणे आठ वाजता संगमनेरहून निघालेली एमएच १४ बीटी ३०८७ ही संगमनेर आगाराची संगमनेर-पुणे एसटी बस खेड घाटात दहाच्या सुमारास आली. घाटाच्या उतारावरून धावत असताना चालक अनिल लक्ष्मण थोरात यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. चक्कर आल्यासारखे झाले. काही समजायच्या आत त्यांच्या डोळ्यांपुढे अंधारी आली. यावेळी एसटीत ४४ प्रवासी प्रवास करीत होते. आपल्याला काही तरी होतंय, असे वाटताच चालक थोरात यांनी प्रसंगावधान राखले. स्वतःच्या जिवावर आलेले असतानाही त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी करीत एसटी बस सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला उभी केली. बस अचानक घाटात उभी राहिल्याने प्रथम गोंधळलेल्या प्रवाशांना काहीच समजले नाही. परंतु, थोरात यांनी त्रास होत असल्याचे वाहक बाळकृष्ण गाडेकर यांना सांगितले. वाहक गाडेकर यांनी गांभीर्य ओळखून पाठीमागून आलेल्या एका वाहनात थोरात यांना बसवले व तातडीने राजगुरुनगर येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. थोरात यांना वेळीच उपचार मिळाले. चालक थोरात यांनी प्रसंगावधान दाखविल्याने मोठा अनर्थ टळला. थोरात यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाबद्दल राजगुरुनगर आगार व्यवस्थापक गौरव काळे यांनी कौतुक केले.