खेडमध्ये ढगाळ हवामानामुळे शेतकरी हवालदिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेडमध्ये ढगाळ हवामानामुळे शेतकरी हवालदिल
खेडमध्ये ढगाळ हवामानामुळे शेतकरी हवालदिल

खेडमध्ये ढगाळ हवामानामुळे शेतकरी हवालदिल

sakal_logo
By

कडूस, ता. १३ : खेड तालुक्यात मागील तीन दिवसंपासून ढगाळ हवामान व अवकाळी पावसाच्या शिडकाव्यामुळे रब्बी हंगामातील कांदा पीक धोक्यात आले आहे. पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याच्या धास्तीने शेतकरी हवालदिल झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकावर औषध फवारणीसाठी औषध फवारणी पंप हाती घेतल्याचे चित्र खेड तालुक्यात दिसत आहे.
अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होताना आढळत आहे. प्रामुख्याने रब्बीतील कांदा धोक्यात आला आहे. कांद्याची पात पिवळी पडू लागली आहे. कांदा पिकाला अवकाळी पाऊस, धुके व ढगाळ हवामानाचा मोठा धोका असतो. वातावरणातील या बदलांमुळे करपा व पातीच्या गाभ्यात माव्याच्या प्रदूर्भावासह पातीवर काळे ठिपके पडून कांद्याच्या उत्पादनात मोठी घट होत असते. शेतकऱ्यांना दरवर्षीच वातावरणातील या बदलांचा फटका बसत असतो. सध्या कांदा लागवडीचे दिवस सुरू आहेत. अनेक शेतकऱ्यांची कांदा लागवड उरकली आहे तर काहींची रोपे लागवडीसाठी तयार झाली आहेत. परंतु सलग तीन दिवसांच्या ढगाळ वातावरण व पावसाच्या शिडकाव्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. लागवड झालेल्या कांदा पिकासोबत लागवडीयोग्य रोपांवर हवामानाचा प्रतिकूल परिणाम होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी पिकाची खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. खेड तालुक्यातील बहुतांश कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कांदा पिकावरच वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते.

00917