ऑलिम्पिकवीर डावरे यांची उपेक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑलिम्पिकवीर डावरे यांची उपेक्षा
ऑलिम्पिकवीर डावरे यांची उपेक्षा

ऑलिम्पिकवीर डावरे यांची उपेक्षा

sakal_logo
By

कडूस, ता. २४ : ‘‘ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेड तालुक्याचे सुपुत्र व शिवछत्रपती पुरस्कार विजेते पहिलवान स्व. बबनराव डावरे यांची राज्यात उपेक्षाच झाली. जागतिक दर्जाच्या कुस्तीगीर असताना त्यांच्या स्मृती दुर्लक्षित राहिल्या. नवोदित खेळाडूंना त्यांच्या कार्यापासून प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, यासाठी ‘ऑलिम्पिकवीर पै. कै. बबनराव डावरे फाउंडेशन’ काम करणार आहे,’’ अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक व डावरे यांचे नातू अविनाश डावरे यांनी दिली.
खेड तालुक्यातील कोरेगाव बुद्रुकचे सुपुत्र स्व. बबनराव डावरे यांनी सन १९५६ मध्ये सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे झालेल्या १६व्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्ती संघामध्ये प्रतिनिधित्व केले. त्यांनी राज्यासह राष्ट्रीयस्तरावर कुस्तीमध्ये अनेक पदके मिळवली. सन २००१ मध्ये त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले होते. खेड तालुका पत्रकार संघ व ऑलिम्पिकवीर पै. बबनराव डावरे फाउंडेशनच्या वतीने स्व. बबनराव डावरे यांची जयंती वाकी (ता. खेड) येथे साजरी करण्यात आली. त्यावेळी अविनाश डावरे हे बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘कोरेगाव बुद्रुकसारख्या खेड्यातल्या बबनराव डावरे यांनी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारतीय कुस्ती संघाचे प्रतिनिधित्व केले. ही खेड तालुक्यासाठी असामान्य घटना आहे. दोन हजारपेक्षा जास्त स्पर्धात्मक कुस्त्या खेळणारे, स्वातंत्र्यलढ्यात उडी घेणारे, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये अनेक सुवर्णपदक मिळविणारे, नवोदित क्रीडापटू घडविणारे व अंधश्रद्धाविरोधी काम करणारे आणि चरितार्थासाठी पुण्यात रिक्षा चालविणारे, असा त्यांचा असामान्य जीवनप्रवास आहे. तो खेड तालुक्याला अभिमानास्पद आहे. परंतु, तो दुर्लक्षित राहिला आहे. त्यांचे तालुक्यात स्मारक होणे गरजेचे आहे. यासाठी फाउंडेशन काम करणार आहे.’’
यावेळी फाउंडेशनचे सचिव प्रा. विजय बालघरे, दिलीप डावरे, अशोक डावरे, विश्वास देशमुख, सोनू डावरे, बाळासाहेब डावरे व डावरे कुटुंब उपस्थित होते.