वाशेरेकर नळ पाणीपुरवठा योजनेच्या प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशेरेकर नळ पाणीपुरवठा योजनेच्या प्रतीक्षेत
वाशेरेकर नळ पाणीपुरवठा योजनेच्या प्रतीक्षेत

वाशेरेकर नळ पाणीपुरवठा योजनेच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By

कडूस, ता. २४ : चार वर्षांपूर्वी गावाला एकसष्ठ लाख रुपयांची नळ पाणी पुरवठा योजना मिळाली. साडेतीन वर्ष काम चालले. योजनेचा पैसाही खर्च झालाय. योजना सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाली आहे, असे अधिकारी सांगत आहेत. सगळे ठाकठीक असूनही या योजनेच्या नळाला अजून एकदाही पाणी आले नाही. ग्रामस्थ आजही पाण्याच्या प्रतीक्षेत नळाकडे डोळे लावून बसलेत. ही शोकांतिका आहे वाशेरे गावच्या नळ पाणी पुरवठा योजनेची. आता या कामाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पाण्यासाठी आजही डोक्यावर हंडा घेऊन महिला, शाळकरी मुले पायपीट करीत आहेत.
वाशेरेच्या करवंदेवस्ती, तळपेवाडी, चिमटेवाडी, भोतेवाडी व पाटेवाडी या पाच विखुरलेल्या एकूण एक हजार लोकसंख्येच्या वस्त्यांसाठी २०१९ मध्ये एकसष्ठ लाख रुपये खर्चाची नवीन नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. काम साडेतीन वर्ष चालले. गेल्या मार्चमध्ये या योजनेचे काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे वृत्त दै.''सकाळ''ने दिले होते. त्यानंतर हालचाल होऊन पुढील दोन महिन्यात अपूर्ण कामे पूर्ण करण्यात आली. आता सहा महिन्यांपूर्वी योजना पूर्ण झाली आहे, पण योजना अजूनही कार्यान्वित नाही. या योजनेतील नळाला एकदाही पाणी आले नाही. ग्रामस्थ आजही डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. गावाला दरवर्षी जानेवारी महिन्यातच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

महिला शाळकरी मुलांची
ग्रामस्थांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी शासनाने एवढी मोठी रक्कम खर्च केली, पण चार वर्षानंतरही त्याचा काडीमात्र उपयोग झाला नसल्याचे दिसत आहे. एवढी मोठी रक्कम खर्च करून केलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या नळाला पाणी कधी येणार, असा सवाल पाणी टंचाईग्रस्त ग्रामस्थ करीत आहे.

नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण आहे. अजून ग्रामपंचायतीने ताब्यात घेतली नाही. नळाला पाणी येऊ नये, म्हणून काही लोक जाणूनबुजून योजनेचे नुकसान करीत आहेत. विद्युत मोटारीची केबल चोरून नेणे, पाइपलाइनचे नुकसान करणे, विहिरीवरील लोखंडी खांब चोरून घेऊन जाणे, असे प्रकार होत आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात पण तक्रारी अर्ज दिला आहे.
- संभाजी कुडेकर, सरपंच


नळ पाणी पुवठा योजना पूर्ण करून देणे आमचे काम आहे. ते चालवायचे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचे काम आहे. आम्ही सहा महिन्यांपूर्वी योजना पूर्ण करून दिली आहे. काही काम अपूर्ण असेल तर पूर्ण करून देऊ.
- ए.एन.जकीनकर,शाखा अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग