कडूसच्या बंधाऱ्यातील साठा चिंताजनक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कडूसच्या बंधाऱ्यातील साठा चिंताजनक
कडूसच्या बंधाऱ्यातील साठा चिंताजनक

कडूसच्या बंधाऱ्यातील साठा चिंताजनक

sakal_logo
By

कडूस, ता. १० : कडूस (ता.खेड) येथील कुमंडला नदीवरील बंधाऱ्यातील पाणी साठा संपुष्टात येऊ लागला आहे. बंधारा कोरडा ठणठणीत पडू लागला आहे. जेमतेम आठ ते दहा दिवस पुरेल एवढा पाणी साठा शिल्लक राहिल्याने परिसरातील शेतीचारा पिके धोक्यात आली आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

पाण्याचा एकमेव आधार असलेला बंधारा कोरडा पडण्याच्या स्थितीत असल्याने परिसरातील पशुपालक व दुग्ध उत्पादक शेतकरी चिंता व्यक्त करीत आहे. पाणी साठा संपल्यास नागरिकांसह जनावरांना पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
कडूस परिसरातील सुमारे एक ते दीड हजार एकरचा शेतीशिवार व डझनभर वाड्यावस्त्यांना बाराही महिने कुमंडला नदीवरील बंधाऱ्यातील पाण्यावर अवलंबून राहावे लागते. परंतु हा बंधारा सध्या पाण्याअभावी कोरडा पडू लागला आहे. यामुळे परिसरातील सुमारे हजार एकर शेती व परिसरातील शेंडेवाडी, गारगोटवाडी, मुसळेवाडी, तुरुकवाडी व गावठाणासह तेलदरा, धोंडमाळ, रुकेदरा आदी आदिवासी वाड्यावस्त्यांच्या पाणी योजना धोक्यात आल्या आहेत.

बेकायदेशीर, चोरून पाणी उपश्‍यात वाढ
चारा पिकांबरोबरच जनावरांना पिण्यासाठी सुध्दा पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. परिसरात उन्हाळ्याची दाहकता प्रकर्षाने जाणवू लागली आहे. शेती व पिण्याच्या पाण्याचा एकमेव आधार असलेला पाटबंधारे खात्याच्या अखत्यारीतील २.२५ दशलक्ष घनमीटर पाणी साठ्याची क्षमतेच्या बंधाऱ्याची देखभाल व त्यातील पाण्याच्या नियोजनाची जबाबदारी भैरवनाथ पाणी वाटप सहकारी संस्थेवर आहे. शेतकरी संस्थेला पाणीपट्टी भरून शेतीसाठी पाणी उपसतात. परंतु बंधाऱ्यातून बेकायदेशीर व चोरून पाणी उपसण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. याचा त्रास सर्वसामान्य व प्रामाणिक शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. परंतु दहशत, भीती व राजकीय दबावामुळे यावर कोणीच बोलायला धजावत नाही.


01043