
उजनी प्लसमुळे शेतकऱ्यांना दिलासा
कळस, ता. १६ : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने उजनीतील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. काही दिवसांपूर्वी मृत साठ्यातील धरणाच्या पाणी पातळीने आता कमालीची उसळी घेतली आहे. प्लसमध्ये आलेल्या या धरणाच्या पाणी साठ्यामुळे उजनीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असलेले उजनी हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण आहे. गतवर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे ११० टक्के भरले होते. धरण पूर्ण भरल्यानंतर यामध्ये ११७ टीएमसीहून अधिक पाणी साठा होतो. यापैकी सुमारे ६३ टीएमसी पाणी साठा हा मृत साठा म्हणून घोषित केलेला आहे. मृतसाठ्यावरील पाणी वाटपाचे नियोजन होत असते. मात्र दरवर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरुनही उन्हाळ्यात मात्र ते मृत साठ्यात पोहचते.
यंदा जुनमध्ये उजनी धरण परिसरात मोठे पाऊस झालेले नाहीत. गेल्या आठवडा भरापासून रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. मात्र या पावसाचा फारसा उपयोग शेतकऱ्यांना झाला नाही. अद्याप विहीरींची पाणी पातळी वाढलेली नाही. पेरणी केलेल्या खरीपातील पिकांना या पावसाचा काहीसा दिलासा मिळालेला आहे. जूनपासून आतापर्यंत धरण क्षेत्रात २६७ मिलीमिटर पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या पन्नास टक्के आहे. परंतू स्थानिक पावसाच्या जीवावर धरण भरत नाही. पुण्यातून येणारे पाणी धरण भरण्यास उपयुक्त ठरते. सध्या दौंड येथून ३९ हजार १८० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
दरम्यान उजनी धरणाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे म्हणाले, सध्या ठरणात ३५.११ टक्के पाणीसाठा झाला आहे. दौंडमधून नदीपात्रात येणारा विसर्ग हा ३९ हजार क्युसेकहून अधिक असल्याने मृत साठ्याच्यावर धरणात सुमारे १९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मृत साठ्यासह एकुण सुमारे ८३ टीएमसी पाणी साठा झाला आहे.
उजनीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने शेतकऱ्यांची विद्युत पंप हलविण्याची लगबग सुरू आहे. तर गाळपेर जमिनीवर चारा पिके घेतलेल्या शेतकऱ्यांकडून या पिकांची काढणी सुरू आहे. पाणी वाढत असल्याने काही हौशी लोक मच्छिमारीचा आनंद लुटत आहेत. रबरी ट्युबच्या साह्याने जाळीचा वापर करुन तर काही जण गळाच्या साह्याने मासे पकडण्यासाठी वाढत्या फुगवट्यात धडपडत असल्याचे चित्र सर्रास पहायला मिळत आहे.
........
01188
Web Title: Todays Latest District Marathi News Kal22b00532 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..