कोपरीमुळे रुईतील कुटुंबांना ''अच्छे दिन'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोपरीमुळे रुईतील कुटुंबांना ''अच्छे दिन''
कोपरीमुळे रुईतील कुटुंबांना ''अच्छे दिन''

कोपरीमुळे रुईतील कुटुंबांना ''अच्छे दिन''

sakal_logo
By

कळस, ता. २९ : शेतकरी, मेंढपाळ यांच्याकडून आवर्जून वापरली जाणारी कोपरी बनविण्याचा व्यवसाय करणाऱ्या रुई (ता. इंदापूर) येथील कुटुंबांना या आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. येथील कारागिरांनी बनविलेली कोपरी राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचली असून, तिला चांगली मागणी आहे. वर्षभरात साडेतीन लाखांहून अधिक कोपऱ्यांची विक्री होत असल्याने
कारागीर कुटुंबांना अच्छे दिन आले आहेत.

कोरोनामुळे लॉकडाउनमध्ये ठप्प झालेला व्यवसाय आता जोमाने सुरू झाला असून, येणाऱ्या यात्रा-जत्रांच्या हंगामात कोपरीला असलेली मागणी विचारात घेऊन कोपऱ्या तयार करण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू आहे. जाडंभरडं कापड, मोठे खिसे अशी ओळख असलेल्या कोपरीला ग्रामीण भागातील शेतकरी व मेंढपाळांकडून विशेष मागणी आहे. पुरुषांकडून वापरण्यात येणारी कोपरी ग्रामीण राहणीमानाचा एक अविभाज्य भाग आहे. मोठ्या खिशांमुळे कोपरीत बरेच साहित्य मावत असल्याने कोपरी प्राचीन काळापासून लोकप्रिय आहे. फॅशनच्या युगात आजही कोपरीला मागणी टिकून आहे.

वर्षभरात साडेतीन लाखांहून अधिक विक्री
रुई सारख्या छोट्या गावात कोपऱ्यांची मागणी विचारात घेऊन येथील बाळू गौतम मारकड यांनी या व्यवसायाची निवड केली. कोपरीसाठी लागणारे कापड पाणीपत, दिल्ली, भिवंडी, मुंबई येथून ते खरेदी करतात. कोपरीच्या मापानुसार कापड कापल्यानंतर शिलाई मशिनच्या साह्याने शिवणकाम केले जाते. तयार केलेल्या कोपऱ्या ते होलसेल दराने विक्री करतात. व्यापारी त्यांना कोपऱ्यांची ऑर्डर देतात. त्यानुसार ते कोपऱ्या पुरवितात. दिवसाकाठी एका कुटुंबाकडून कोपऱ्यांचे शंभर नग तयार केले जातात.

माझे संपूर्ण कुटुंब कोपरी तयार करण्याचे काम करते. आम्ही इतर कुटुंबांनाही कोपरी निर्मितीच्या माध्यमातून रोजगार मिळवून दिला आहे. गावात दहा ते बारा कोपरी शिवणारे कारागीर तयार झाले आहेत. आम्ही तयार केलेल्या कोपऱ्या म्हसवड, नगर, जामखेड, मिरजगांव, काष्टी, सुपा याठिकाणी विकल्या जातात. याशिवाय येथील बाबीर देवाची यात्रा, पंढरपूर, म्हसवड, फलटण यांसह धनगर समाजाच्या यात्रांमध्ये कोपऱ्यांची चांगली विक्री होते. . यामुळे गावातील पाच ते सात कुटुंबांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे.
- बाळू मारकड, कोपरी व्यावसायिक
.......
01377