
रस्त्यांना जड झाले ओझे!
रस्त्यांना जड झाले ओझे!
ओव्हरलोड वाहतूक : इंदापूरमधील पश्चिम भागात दुरवस्था
सचिन लोंढे : सकाळ वृत्तसेवा
कळस, ता. २ : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील रस्त्यांवरून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नव्याने बांधण्यात आलेले रस्त्याचे या वाहतुकीमुळे मोठे नुकसान झाले आहे. पालखी महामार्गाच्या कामासाठी लागणारी खडी, मुरमाचे डंपर क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करत असल्याने रस्त्यांची दुरवस्था होत आहे. रात्रंदिवस ही वाहतूक होत असून, सुमारे दीडशेहून अधिक डंपर या परिसरातून वाहतूक करत आहेत. परिणामी रस्त्यांच्या दुरावस्थेबरोबर अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे त्यावर अंकुश ठेवण्याची गरज आहे, असे नागरिकांचे मत आहे.
रस्ता दुरवस्थेची कारणे
- काही महिन्यांपासून पालखी महामार्गाचे काम सुरू
- खडी, मुरूम यांसारखे गौणखनिजांची वाहतूक
- कंपनीकडून मल्टीअॅक्सल डंपरचा वाहतुकीसाठी वापर
- क्षमतेपेक्षा जास्त वजनाची डंपर वाहतूक
- ऊस वाहतूक करणारी वाहनांची संख्या जास्त प्रमाणात
अवजड वाहतुकीमुळे दुरवस्था झालेले रस्ते व अंतर
भवानीनगर साखर कारखाना ते अकोले रस्ता- ९ किलोमीटर
अंथुर्णे-भरणेवाडी ते बिरंगुडवाडी रस्ता- ३.५ किलोमीटर
बोरीपाटी ते शेळगाव रस्ता- ५.५ किलोमीटर
शेटफळगढे-लाकडी-निंबोडी ते सणसर-कुरवली रस्ता- १९ किलोमीटर
बारामती-जळोची ते लाकडी-कळस-लोणीदेवकर रस्ता- १३ किलोमीटर
डाळज नं. २ ते वालचंदनगर-कळंब-नातेपुते रस्ता- ९.५ किलोमीटर
कळंब-लासुर्णे रस्ता- ६ किलोमीटर
वालचंदनगर-रत्नपुरी ते अंथुर्णे -शेळगाव रस्ता- ५ किलोमीटर
निधी पाण्यात
या रस्त्यांच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यात गेल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. या रस्त्यांवर गौणखनिज व उसाची वाहतूक करत असलेल्या वाहनांमुळे वर्दळ निर्माण झाली आहे. परिणामी वारंवार किरकोळ अपघाताला होत आहेत.
उपविभागांतर्गत येणाऱ्या आठ
रस्त्यांचा ७० किलोमीटरहून अधिक लांबीच्या टप्प्याची या वाहतुकीमुळे दुरवस्था झाली आहे. ज्या रस्त्यांची तीस टन वाहतुकीची क्षमता आहे, त्या रस्त्यांवरून पन्नास टनांपर्यंतची वाहतूक होत आहे. ही बाब गंभीर असून, या वाहतुकीमुळे रस्ते तग धरणे शक्य नाही. याबाबत बारामतीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे. सदर ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांचे नुकसान होत असून, शासकीय मालमत्तेचे नुकसान होत आहे. यावर त्यांच्याकडून कारवाई होणे अपेक्षित आहे.
-मधुकर सुर्वे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
बिरंगुडवाडी (ता. इंदापूर) : रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्तीची वाहतूक करणारी वाहने.