रस्ताच दाखवतोय एमआयडीसीचे वास्तव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ताच दाखवतोय एमआयडीसीचे वास्तव
रस्ताच दाखवतोय एमआयडीसीचे वास्तव

रस्ताच दाखवतोय एमआयडीसीचे वास्तव

sakal_logo
By

सचिन लोंढे : सकाळ वृत्तसेवा
पळसदेव, ता. २ लोणी देवकर (ता. इंदापूर) येथील ‘एमआयडीसी’मध्ये मूलभूत सुविधांची वाणवा पाहायला मिळत आहे. पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या या एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी असलेला प्रमुख मार्ग एमआयडीसीतील वास्तव दर्शवतो.
या महामार्गावरून एमआयडीसी रस्त्याकडे वळले की रस्त्यावरील खड्डे वाहनचालकांचे स्वागत करतात. येथे पडलेला मोठा जीवघेणा खड्डा अपघातास निमंत्रण देत आहे. हीच वस्तुस्थिती अंतर्गत रस्त्याचीही झाली आहे. येथे येणाऱ्या उद्योगांना अंतर्गत रस्ते, मुबलक पाणी, वीज, सुरक्षितता महत्त्वाची आहे. परंतु, येथे एमआयडीसीकडून या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, उद्योगांना पिण्याचा शुद्ध पाणी पुरवठा एमआयडीसीकडून होत नाहीत. त्यामुळे येथील कंपनी प्रशासन नाराजी व्यक्त करत आहे. येथे ठरावीक मोठे उद्योग वगळता अन्य छोटे उद्योग पिण्याच्या पाण्यासाठी वाढीव भुर्दंड सहन करत आहेत.
एमआयडीसीमधील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. याशिवाय रस्त्यालगत पथदिव्यांची सोय असणे गरजेचे आहे. बसविलेले अनेक पथदिवे बंदावस्थेत आहेत. या पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती वेळेवर होणे गरजेचे आहे. वाहनचालकांसाठी विश्रांतीगृहाची व्यवस्था येथे असणे गरजेचे आहे. पुणे-सोलापूर महामार्गाला जोडणाऱ्या एमआयडीसी रस्त्याची दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे आहे. येथे बहुतांश उद्योग हे ॲॅटोमोबाईल क्षेत्राशी निगडित असल्याने अनेक अवजड वाहने येथे येत असतात. त्यामुळे वाहनांची संख्या, वाहनातील साहित्याचे वजन लक्षात घेता त्या क्षमतेचे टिकाऊ रस्ते तयार करणे गरजेचे आहे.

मागणी एवढा पाणी पुरवठा
एमआयडीतील प्रत्येक उद्योगाला त्यांच्या मागणी एवढे पिण्यास योग्य पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे विठ्ठल राठोड यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘एमआयडीसीचे स्वतंत्र ३ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. यातून दररोज १६ लाख लिटर पिण्यास योग्य पाणी उद्योगांना पुरविण्यात येत आहे. येणाऱ्या काही नवीन उद्योगांनाही त्यांच्या मागणीनुसार पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे.’’

(क्रमशः)