उद्योजक होण्याच्या स्वप्नांना बॅंकांमुळे ब्रेक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योजक होण्याच्या स्वप्नांना बॅंकांमुळे ब्रेक!
उद्योजक होण्याच्या स्वप्नांना बॅंकांमुळे ब्रेक!

उद्योजक होण्याच्या स्वप्नांना बॅंकांमुळे ब्रेक!

sakal_logo
By

सचिन लोंढे : सकाळ वृत्तसेवा
कळस, ता. २८ : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेच्या माध्यमातून हक्काचा रोजगार मिळण्याची अनेक तरुणांची आशा बँकेच्या धोरणामुळे मावळली आहे. जिल्ह्यातील सुमारे १६६ प्रस्ताव बँकेने नाकारले असून, ३१४ प्रस्ताव अद्यापही मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रकरणे ‘सिबिलस्कोर’मुळे नामंजूर झाली आहेत. एकीकडे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शासन रोजगारनिर्मितीचे प्रयत्न करत असताना बँकेच्या काही धोरणांचा मोठा फटका योजनांना खीळ बसण्यास कारणीभूत ठरत आहे. सदर योजना पूर्णपणे बँकेशी निगडित असल्याने लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अशी आहे योजना
पशुखाद्य, मत्स्यखाद्य, कुकुटखाद्य, फळे व भाजीपाला प्रक्रिया, अन्नधान्य प्रक्रिया, दुग्ध प्रक्रिया, बेकरी, तेलघाणा, फरसाण यांसारख्या खाद्यपदार्थांसह सुमारे दीडशेहून अधिक प्रकारच्या प्रक्रिया व मूल्यवर्धन उद्योग उभारणीसाठी कृषी विभाग व बँकेच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजना राबविली जात आहे. लाभार्थ्याने कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर नेमलेल्या जिल्हा समन्वयाच्या माध्यमातून कर्ज मंजुरीसाठी प्रस्ताव बँकेत पाठविला जातो. बँकेने प्रकल्पास कर्ज मंजुरीचे पत्र दिल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाते.

अनुदानाचे स्वरूप
- लाभार्थ्याला ३५ टक्के अनुदान दिले जाते.
- वैयक्तीक लाभार्थी अथवा बचत गटातील लाभार्थ्यांना जास्तीत जास्त १० लाख रुपयांचे अनुदान दिले जाते.
- सहकारी संस्था अथवा फार्मर प्रोडूसर कंपनीला प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अथवा जास्तीत जास्त ३ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते.

योजनेच्या प्रस्तावांच्या सद्यःस्थितीची आकडेवारी
- जिल्ह्यातून आतापर्यंत आलेले प्रस्ताव- १२३६
- अपूर्ण कागदपत्रे असलेले प्रस्ताव- ४३४
- बँकेने नामंजूर केलेले प्रस्ताव- १६६
- बँकेकडे मंजुरीसाठी प्रलंबित असलेले प्रस्ताव- ३१४
- प्रकल्पांना बँकेने मंजुरी दिलेले प्रस्ताव- २२६

प्रस्ताव नाकारण्याची कारणे
- सिबिलस्कोर कमी असणे
- कार्यक्षेत्रात लाभार्थी न बसणे
- लाभार्थी बँकेचा खातेदार नसणे
- उद्दिष्ट पूर्ण झाले

आम्ही टोमॅटो प्रक्रीया उद्योगाच्या उभारणीसाठी प्रस्ताव सादर केला होता. सुरवातीला इंदापूरच्या बँक आॅफ इंडियाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी दिला. यावर बँकेने अंतराचे कारण देत प्रस्ताव नाकारला. यानंतर बावड्यातील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत प्रस्ताव दिला. त्यांनीही प्रस्ताव नाकारला. शेवटी आयसीआयसीआय बँकेच्या बावडा शाखेने कर्ज देण्याची तयारी दर्शविली. मात्र, या बँकेमध्ये हेलपाटे मारण्यात वर्षभराचा काळ लोटला. मंजुरीसाठी एवढी धावपळ करावी लागत असेल, तर पुढे काय? या विचाराने उद्योग उभारणीचे स्वप्न गुंडाळून ठेवले आहे.
- ज्योतिराम कुरडे, बावडा (ता. इंदापूर)

तरुणांच्या रोजगारनिर्मितीच्या दृष्टिकोनातून सदर योजना चांगली आहे. तालुक्यात तेलघाणा, दुग्ध पदार्थनिर्मिती, पशुखाद्य यांसारखे काही प्रकल्प या योजनेतून सुरू झाले आहेत. या योजनेत बँकेने प्रस्ताव मंजूर केल्याशिवाय पुढील कोणतीच कार्यवाही होत नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बँकांच्या प्रतिनिधींसोबत होणाऱ्या त्रैमासिक बैठकीत प्रकरणे मंजूर करण्याबाबत वारंवार बँकांना सूचना दिलेल्या आहेत.
- भाऊसाहेब रूपनवर, तालुका कृषी अधिकारी, इंदापूर

बॅंकेकडील प्रस्तावांचा तालुकानिहाय तक्ता
तालुका....एकूण प्रस्ताव...दाखल प्रस्ताव...मंजूर प्रस्ताव...नामंजूर
प्रस्ताव...प्रलंबित प्रस्ताव
भोर.........३१..............२१..................१२..............४...............४
वेल्हा.......३०..............१२...................४................३..............५
मुळशी......५१..............१६...................५................३..............५
मावळ......३८...............२६..................१०...............६..............७
हवेली......१४२..............७४..................३०...............९.............२१
खेड........१४०.............१०७..................२८..............३६............३७
आंबेगाव....७६...............५४....................४...............१०............२९
जुन्नर........१०१.............५६..................१३................१९.............१९
शिरूर.........८५..............६९.................२४................१८.............२०
पुरंदर........८७..............४८.................१२.................३..............२७
बारामती....१०३.............७३................१५.................८................३५
दौंड.........२१८............१७०...............४६................३२...............८२
इंदापूर.......१३४.............७६...............२३................१५................२३
एकूण.......१२३६............८०२.............२२६.............१६६...............३१४