पळसदेवच्या सरपंच मोरे यांचा राजीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पळसदेवच्या सरपंच मोरे यांचा राजीनामा
पळसदेवच्या सरपंच मोरे यांचा राजीनामा

पळसदेवच्या सरपंच मोरे यांचा राजीनामा

sakal_logo
By

पळसदेव, ता. १२ : पळसदेव (ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच इंद्रायणी सुजित मोरे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला आहे. ग्रामपंचायतीच्या सभागृहात आज झालेल्या विशेष बैठकीत त्यांच्या राजीनामा पत्राची पडताळणी करण्यात आली.
येथील ग्रामपंचायतीच्या चाव्या राष्ट्रवादीने आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. या पक्षाच्या विचाराच्या ८ सदस्यांनी एकत्रित येत सदरपंच पदाचा कालावधी वाटून घेतला आहे. या वाटपानुसार दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर इंद्रायणी मोरे यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा नुकताच गटविकास अधिकाऱ्यांकडे दिला होता. गटविकास अधिकाऱ्यांनी राजीनामा पडताळणीसाठी ग्रामपंचायतीकडे पाठविल्यानंतर बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये मोरे यांनी राजीनामा दिल्याचे सिद्ध झाले. यावेळी उपसपंच कैलास भोसले, ग्रामविकास अधिकारी तुकाराम शिंदे यांसह अन्य १२ सदस्य उपस्थित होते.
राजीनाम्याबाबत इंद्रायणी मोरे यांच्याकडे विचारणा केली असता त्या म्हणाल्या, की स्वखुशीने सरपंचपदाचा राजीनामा दिला आहे. दोन वर्षांच्या कार्यकालामध्ये कोट्यवधींची विकास कामे करता आली याचे समाधान आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण माने, आमदार दत्तात्रेय भरणे यांसह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष
सरपंचपदाच्या राजीनाम्यानंतर आता गावातील विरोधकांच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतीवर बलाबल सिध्द करण्यासाठी विरोधकांना एका सदस्याची आवश्यकता आहे. यामुळे गावातील राजकीय समिकरणे बदलणार काय याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. याशिवाय सरपंचपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी प्रयत्नशील असलेल्यांचीही चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे.
01792