
शेतकऱ्यांची पिके जगविण्यासाठी धडपड
पळसदेव, ता. ८ : इंदापूर तालुक्यात एकीकडे शेतातील पिकांना पाण्याची अत्यावश्यक गरज असताना, दुसरीकडे वीज पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. तालुक्यातील शेतीचा वीजपुरवठा दोन तासांनी कमी करुन दिवसा सहा तास व रात्री आठ तास वीज पुरवठा करण्याचे सुधारीत वेळापत्रक तयार केले आहे. मात्र, यामध्येही तांत्रिक दोष निर्माण झाल्यास वाढीव तास-दोन तास भारनियमन होत असल्याने, शेतकऱ्यांची वीजेअभावी मोठी परवड होत आहे. पाण्याअभावी सुकू लागलेली पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची सध्या धडपड सुरू आहे.
तालुक्यातील ऊस, फळबागा, जनावरांच्या चाऱ्याची पिके जगविण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. तीव्र तापमानामुळे विहिरींच्या पाणी पातळीने तळ गाठला आहे. यामुळे पाणी टंचाईच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या शेतकऱ्यांना वीज टंचाईचा सामना करावा लागत आहे. वीज कंपनीने शेतीसाठीच्या वीज पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल केला आहे. काही ठिकाणी फक्त दिवसा ६ तास वीज देण्याचे नियोजन केले आहे. मात्र, काही वेळी यामध्ये तांत्रिक अडचणी येतात. उजनीलगतच्या शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीजपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून लोणी-देवकर येथील उपकेंद्राच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येतो. या उपकेंद्रातंर्गत १६ गावातील सुमारे सहा हजार कृषी पंप कनेक्शनधारक शेतकरी आहेत.
सध्या तालुक्यात खडकवासला कालव्याचे आवर्तन सुरू आहे. मात्र कालव्यातील पाणी केवळ पाहण्यापलिकडे शेतकऱ्यांना वीजेअभावी काहीच करता येत नसल्याची वस्तूस्थित आहे. कळस येथील उपकेंद्रावर येणारा अतिरिक्त ताण वीज पुरवठ्याचे नियोजन कोलमडून टाकत आहे. लासुर्णे शाखेचे अभियंता ए. बी. यादव म्हणाले, कळस येथील उपकेंद्रावर जास्तीचा भार येत असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना केवळ दिवसा वीज पुरवठ्याचे नियोजन केले आहे.
खडकवासला कालव्याचे पाणी शेतकऱ्यांसाठी मृगजळ झाले आहे. कालव्याला पाणी आले तर वीज नसते. ही परिस्थिती गेल्या काही वर्षांपासून अनुभवत आहोत. आता केवळ दिवसा वीज दिली जात आहे. मात्र तीही पुरेशी व अखंडपणे दिली जात नाही. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने पिके जगविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
-विजय गावडे, शेतकरी, कळस
कृषी पंपधारकांना दिवसा ६ तास व रात्री ८ तास वीज पुरवठा करण्याचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. परंतु पुरवठ्याच्या तासांमध्ये अनेकदा वीज गायब होत आहे. मिळणारी वीज पुरेशी नसल्याने अनेकदा पंप सुरू होत नाहीत. उजनीचे पाणी झपाट्याने कमी होत असून, वीजेची समस्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने नुकसानकारक आहे.
- शरद काळे-पाटील, संचालक, कर्मयोगी साखर कारखाना, पळसदेव
पुरेशा दाबाने वीजपुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून वीज पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल केला आहे. दोन तासांनी वीजपुरवठा कमी करत उपलब्ध ग्राहकांना पुरेशा दाबाने वीज देण्याचे नियोजन आहे. वीजेची गळती व चोरी रोखण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.
- व्ही.डी. गावडे, शाखा अभियंता, लोणी उपकेंद्र