पळसदेवच्या राजकारणात उलथापालथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पळसदेवच्या राजकारणात उलथापालथ
पळसदेवच्या राजकारणात उलथापालथ

पळसदेवच्या राजकारणात उलथापालथ

sakal_logo
By

पळसदेव, ता. १६ : पळसदेव (ता. इंदापूर) येथील अंतर्गत राजकारणाने वेगळी कलाटणी घेतल्याचे चित्र आहे. इंद्रायणी मोरे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यापासून आजिनाथ पवार हे सरपंचपदी विराजमान होईपर्यंत येथे अनापेक्षित घडामोडी घडल्या आहेत. गावांतर्गत राजकारणात कोणताही राजकीय पक्ष नसल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवत सरपंचपदासाठी वेगळा गट तयार केला आहे. त्यामुळे काही सदस्यांच्या भावना दुखावल्याने त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे जोडे बाजूला ठेवण्याची भूमिका घेतली आहे. येथील राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्या अंजना जगन्नाथ बनसुडे व युवा नेते विशाल बनसुडे यांनी राष्ट्रवादीला रामराम करण्याची भूमिका घेतली आहे.
पळसदेव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विचाराचे आठ व भाजपच्या विचाराचे सात सदस्य निवडून आले. यानंतर राष्ट्रवादीच्या गटाने सुरवातीला इंद्रायणी मोरे यांना सरपंचपदाची संधी देत, दोन वर्षांनी पद बदलण्याबाबतच्या आणाभाका घेतल्याचे बोलले जाते. यानुसार इंद्रायणी मोरे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला. यानंतर हनुमंत बनसुडे यांना सरपंचपद दिले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, ऐनवेळेस सरपंचपदाच्या निवडणुकीत त्यांचा अर्ज बाद झाला. यावेळी अंजना बनसुडे यांचा अर्ज दाखल होता. यामुळे त्यांना सरपंचपद मिळेल, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, भाजपच्या विचाराचे आजिनाथ पवार यांनी यावेळी दाखल केलेल्या अर्जाला आठ मते मिळाल्याने अंजना बनसुडे यांचा पराभव झाला. परिणामी आणाभाका घेऊन पद वाटून घेतलेल्या निर्णयाला तिलांजली मिळाली. यातच नूतन सरपंच आजिनाथ पवार यांचा आमदार भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सत्कार केल्याने बनसुडे यांच्या भावना दुखावल्या आहेत. परिणामी आपण राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे विशाल बनसुडे यांनी सांगितले.