‘बुलेट’स्वारांच्या ‘फटाक्यां’मुळे पाटसकर त्रस्त
कानगाव, ता. १ : ग्रामीण भागात दुचाकी वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. यातही ‘बुलेट’ची क्रेझ तरुणाईला भुरळ घालणारी ठरली आहे. मात्र,याच बुलेटस्वारांच्या सायलेन्सरमधून निघणाऱ्या ‘फटाका’ सदृश आवाजांमुळे पाटस (ता. दौंड)मधील नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. विशेषतः रस्त्याने जाणारे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व महिला आवाजामुळे भयभीत होतात. यातून अपघातांची शक्यताही बळावत असून, काही दिवसांपासून वाढीस लागलेल्या या गैरप्रकाराला आळा घालण्यास पोलिस मात्र अपयशी ठरत आहेत. यामुळे सोकावलेल्या अशा बुलेटस्वार तसेच जी टारगट मुले असे प्रकार करतात त्यांना त्यांच्या पालकांनीही आवर घालण्याची गरज व्यक्त होत आहे.
नोकरदार, महाविद्यालयीन युवक, व्यावसायिकांची ‘बुलेट’ला पसंती आहे.ती कोणीही खरेदी करावी. मात्र, ती चालविताना वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही, याचीही काळजी घेण्याची गरज आहे. मात्र, काही टारगट युवकांनी याच नियमांना ‘खो’ देत जणू उच्छाद मांडला आहे. पाटसमधील मुख्य रस्त्यांवर तसेच ‘सायलेंट झोन’ असलेल्या शाळा-महाविद्यालये, दवाखाने, हॉस्पिटल अशा शांतता प्रतिबंधित क्षेत्रात या ‘बुलेट’स्वारांकडून ‘शाईनिंग’च्या नादात मर्यादा ओलांडली जात आहे. या युवकांकडून ‘बुलेट’च्या सायलेन्सरमध्ये अवैधरीत्या बदल करत तो आवाज फटाक्यांसारखा घुमेल, अशी व्यवस्था केली जात आहे. यामुळे बेभानपणे रस्त्याने जाणाऱ्या या बुलेटस्वारांकडून भर गर्दीत ‘फटाका’ सदृश आवाज काढून नागरिकांमध्ये दहशत बसविण्याचा प्रकार केला जात आहे. यातून अन्य वाहनचालकही बिथरून अपघातांची शक्यताही व्यक्त होत आहे.
अशा फटाके फोडणाऱ्या बुलेटस्वरांच्या गाड्यांचे नंबर किंवा फोटो आम्हाला द्या आम्ही कारवाई करू.
- बाळकृष्ण घोडेकर, पोलिस उपनिरीक्षक, पाटस औट पोस्ट
ध्वनी प्रदूषण रोखणे संदर्भात पोलिस प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार केला असून पोलिसांकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाविरोधात लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
डॉ. नवनीत भागवत, अध्यक्ष, पाटस डॉक्टर असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

