
विजेच्या धक्क्याने तीन गाईंचा मृत्यू
केसनंद, ता. २७ : वढू खुर्द (ता. हवेली) येथे आळंदी रस्त्यालगतच्या जागेत विजेच्या खांबाद्वारे कुंपणात वीज प्रवाह उतरल्याने बुधवारी (ता. २७) दुपारी विजेच्या धक्का बसून तीन देशी गाईंचा मृत्यू झाल्याची तक्रार अशोक कांतिलाल भोंडवे या शेतकऱ्याने केली.
भोंडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी वढू खुर्द येथे पावर हाऊसजवळ आळंदी रस्त्यालगत असलेल्या एका जागेमध्ये त्यांच्या गायी पाणी पिण्यासाठी गेल्या असता तेथे विजेच्या खांबाद्वारे संरक्षक कुंपणासह पाण्यात वीजेचा प्रवाह उतरला असावा. तसेच, गायींना वीजेचा धक्का बसून गायींचा मृत्यू झाल्याच्या शक्यतेने भोंडवे यांनी वीज कंपनी व पोलिस, महसुल तसेच पशुवैद्यकीय विभागाला कळविले. या घटनेची दखल घेत वीज वितरण कंपनीने या परीसरातील सर्वच वीजपुरवठा बंद करून तातडीने घटनास्थळी पाहणी केली असून, सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत बारकाईने तपासणी सुरु केली आहे. पोलिसांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. गाईंचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी येऊन गाईंची उत्तरीय तपासणी केल्यानंतरच समजणार आहे.
या घटनेची चौकशी करून शासन, वीज कंपनीसह संबंधितांकडून गायींची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी भोंडवे कुटुंबाने केली आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Kbm22b02323 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..