
स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू
कोरेगाव भीमा, ता. २७ : धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या ऐतिहासिक कर्तृवाला साजेशे जागतिक दर्जाचे स्मारक सर्वांच्या विचारातून साकारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी वढू बुदूक येथे बोलताना दिली.
आढळराव-पाटील यांनी वढू बुदूक (ता. शिरूर) येथे भेट देऊन धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंच्या समाधिस्थळी दर्शन घेत समाधिस्थळ परिसराची पाहणी केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी तसेच धर्मवीर छत्रपती संभाजीराजे स्मृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आढळराव-पाटील यांनी कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, दरेकरवाडी, येथेही भेट देवून ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न समजून घेतले. यावेळी कोरेगाव भीमा येथे २०१८ च्या दंगलीत स्थानिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, याबाबत कोरेगाव भीमा ग्रामस्थांनी केलेल्या मागणीलाही सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आढळराव-पाटील यांनी दिले.
यावेळी आढळराव-पाटील यांनी डिंग्रजवाडी येथे भेट देवून ग्रामस्थांशी संवाद साधला असता गावच्या गायरान जमिनी शासनाने पूनर्वसनाच्या नावाखाली खासगी व्यक्तींना देऊ केल्याने गावच्या सार्वजनिक उपक्रमाकरिता जागाच शिल्लक राहणार नसल्याने या जमिनी खासगी व्यक्तींना न देता त्या गावच्या हितासाठी सार्वजनिक उपकमासाठीच वापरल्या जाव्यात, अशी आग्रही मागणी डिंग्रजवाडी ग्रामस्थांनी केली.या ही मागणीबाबत शासनाकडे ठोस पाठपुरावा करण्याचे आश्वासन आढळराव-पाटील यांनी दिले.
आढळराव-पाटील यांनी दरेकरवाडी येथे ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेताना दरेकरवाडीला निधीअभावी विकासकामे रखडली असल्याने रस्त्यांच्या कामांसह विविध विकास कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबतही पाठपुरावा करण्याची ग्वाही आढळराव-पाटील यांनी दिले.
दरम्यान, संपूर्ण दौऱ्यात नवनियुक्त शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल काशीद, तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, उपतालुका प्रमुख सागर दरेकरव आंबेगावचे तालुकाप्रमुख अरुण गिरे, आदींसह कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, दरेकरवाडी या तीनही गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
03205